संध्या शिक्षा योजनेअंतर्गत बेळगावसह राज्यातील एकूण 11 महानगरांमधील सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयांमध्ये रात्र महाविद्यालय अर्थात ‘नाईट कॉलेज’ सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या तांत्रिक शिक्षण खात्याने घेतला आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील 11 महापालिका कार्यक्षेत्रात नाईट कॉलेजेस सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये बेळगावातील सरकारी प्रथम दर्जा महिला महाविद्यालयाचा समावेश आहे. रात्र महाविद्यालयासाठी प्राचार्य, सात प्राध्यापक, दोन कर्मचारी, ग्रुप डीचे तीन कर्मचारी अशा एकूण 13 जणांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नाईट कॉलेजेसमध्ये उद्योगाची चांगली संधी असणारा बीकॉम आणि बीसीए अभ्यासक्रम सुरू करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. बेळगाव शहरासह राज्यातील बंगळूर, तुमकुर, म्हैसूर, शिमोगा, दावणगिरी, मंगळूर, धारवाड, विजापूर, गुलबर्गा आणि बळ्ळारी याठिकाणी ही नाईट कॉलेजेस सुरू केली जाणार आहेत.
सध्या राज्यातील काही खासगी महाविद्यालयात अशा प्रकारची रात्र महाविद्यालय अर्थात नाईट कॉलेज सुरू असून बेंगलोरमध्ये अशाप्रकारची 15 महाविद्यालय आहेत. तथापि त्या ठिकाणी बीसीएसाठी 35000 व बीकॉमसाठी 26000 रु. प्रवेश शुल्क आकारले जाते. हे शिक्षण महागडी ठरत असल्यामुळे कमी शुल्क व सवलतीच्या दरात रात्र महाविद्यालय अर्थात नाईट कॉलेज सुरू करण्याचा निर्धार सरकारने केला आहे. यामुळे अनेक गरीब -मध्यमवर्गीयांची सोय होणार आहे. शिक्षण घेण्याची इच्छा असूनही दिवसभर वेळ मिळत नसलेल्या अनेक जणांसाठी ही नाईट कॉलेजेस अनुकूल ठरणार आहेत. संबंधितांना काम करत करत महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.