बेळगाव मनपा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. यामुळे आज विविध अर्ज भरणा केंद्रांवर विक्रमी गर्दी होणार आहे.विविध पक्ष आणि संघटनांचे उमेदवार आज अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत.
बेळगाव मनपाच्या 58 वॉर्डांसाठी होणारी ही निवडणूक विविध कारणांनी गाजत आहे. पूर्वी म ए समितीचे मराठी उमेदवार विरुद्ध इतर अर्थात कन्नड भाषिक उमेदवार असे निवडणुकीचे स्वरूप होते. यावर्षी प्रथमच राष्ट्रीय पक्षांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे. या राष्ट्रीय पक्षांची उमेदवार निवड प्रक्रिया काल रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती,हे सर्व उमेदवार आज अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
म ए समितीची उमेदवार निवड प्रक्रिया गल्लोगल्लीत आणि पंच मंडळींच्या माध्यमातून झाली आहे. यामुळे प्रत्येक वॉर्डातून फक्त एकच मराठी उमेदवार देण्याचा प्रयत्न असून त्याबद्दल जोरदार प्रयत्न झाले आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीने कोणताही उमेदवार स्वतः अधिकृत केला नसून वॉर्डातून एक मताने निवडल्या गेलेल्या उमेदवारांनाच अधिकृत दर्जा देण्यात आला आहे. यामुळे समिती विरुद्ध राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार अशी निवडणूक होणार आहे.
ज्यांनी ज्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्यांच्यासाठी आजची शेवटची संधी असून यासाठी विक्रमी गर्दी होणार आहे.