कर्नाटक उच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत मनपा निवडणुकीस स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यामुळे माजी उपमहापौर आणि वकील धनराज गवळी यांच्या याचिकेवर सुनावणी होऊन मनपा निवडणुकीचा मार्ग खुला आहे.
वॉर्ड रचना आणि आरक्षणात त्रुटी आहेत हे न्यायालयाने मान्य केले आहे.यासंदर्भात मुख्य न्यायमुर्तींनी निवडणूक घेण्याचा निर्णय देण्यात आला आहे,यामुळे आता विरोध करायचाच झाल्यास सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची सूचना याचिका कर्त्यांना देण्यात आली आहे.
न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेवर मनाई दिली नाही. यामुळे सर्व तयारी करून निकाल आल्यावर अर्ज भरण्याची व्यवस्था करणाऱ्यांचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
मनपा निवडणूक: स्थगितीचे जोरदार प्रयत्न
सध्याची स्थिती, गणेशोत्सवावरील निर्बंधांवरून नागरिकांतून होत असलेला विरोध, लसीकरणाच्या नियमावरून होत असलेली टीका यामुळे मनपा निवडणूक घेणे प्रस्थापित लोकप्रतिनिधींना जड जात आहे. यामुळेच सर्व शक्ती पणाला लावून निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
कोरोनामुळे नागरिकांत नाराजी आहे. त्यातच गणेशोत्सव साजरा करण्यास अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. निवडणूक घेताना निर्बंध नसतील तर गणेशोत्सव साजरा करण्यात निर्बंध कशासाठी असा प्रश्न निर्माण करून युवकांनी सोशल मीडियावर रान पेटवले आहे. याचाही त्रास राजकीय प्रतिनिधींना जास्त होत आहे. पक्षाच्या चिन्हावर उमेदवार घेऊन मते मागण्यासाठी जाताना गल्लोगल्लीत हा प्रश्न विचारला जाणार याची धास्ती त्यांना जास्त आहे.
जर राजकीय लोकांनी दोन लसी मिळवून दिल्या तरंच मतदान करूया असा एक संदेश राजकीय व्यक्तींची झोप उडवणारा आहे. लसी कमी पडत आहेत तसेच सरकारी लसीचे खासगीकरण करून फक्त आपल्या व्यक्तींना लस देण्यात आल्याचा समज नागरिकांनी करून घेतला आहे. याला काही वास्तविक परिस्थितीही कारणीभूत असून याचा फटका निवडणुकीवर होईल अशी भिती निर्माण झाली आहे.
गुरुवारी माजी नगरसेवकांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली, तेथे मनाई देण्यास न्यायालयाने विरोध केला. याचबरोबरीने इतर मुद्द्यांवर आवाज उठवून निवडणूक स्थगित करण्यासाठी उद्या जोरदार प्रयत्न होणार आहेत,तश्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.