बेळगाव शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आदी समस्यांसंदर्भात सिटिझन्स कौन्सिल बेळगावतर्फे आज वाहतूक व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांना निवेदन सादर करून संबंधित समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्याची मागणी करण्यात आली.
सिटिझन्स कौन्सिल बेळगावचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सोमवारी सकाळी वाहतूक व गुन्हे अन्वेषण विभागाच्या नूतन पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांची भेट घेऊन त्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून उपायुक्त स्नेहा यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सतीश तेंडुलकर यांनी पोलीस उपायुक्तांना निवेदनातील मागण्यांची माहिती दिली. शहरातील वाहतूक व्यवस्थापनाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आज काल बेशिस्तपणा आणि चुकीचे पार्किंग यामुळे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे किंवा वाहने जप्त केली जात आहेत. तथापि हा कायमस्वरूपी उपाय म्हणता येणार नाही. कारण जनतेला वाहन पार्किंगसाठी जागाच उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. वाहन पार्किंगची सोय न करता दंडात्मक कारवाई करणे हे नैतिकतेला धरून नाही, शिवाय दंड आकारणी देखील अवाच्या सव्वा असते. सध्या शहरात एखाद दुसरी पार्किंगची जागा असली तरी त्या ठिकाणी मोजकीच वाहने पार्क होऊ शकतात. मल्टिलेव्हल पार्किंगचा प्रस्ताव असला तरी तो अद्याप प्रत्यक्षात उतरलेला नाही. सध्याची वाहन संख्या पाहता शहरात किमान 4 मल्टिलेव्हल पार्किंग कॉम्प्लेक्स गरजेचे आहेत. तथापि तोपर्यंत पार्किंगसाठी पर्याय खुल्या जागा उपलब्ध करून दिल्या जाव्यात.
याखेरीज शहरातील वाहतूक कोंडीची समस्या निकालात काढण्यासाठी ‘वन वे’ रस्त्यांची संख्या वाढविण्यात यावी. भौगोलिकरित्या बेळगावात पूर्वेकडून पश्चिमेला जास्तीत जास्त गल्ल्या आहेत आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे तीन अंतर्गत प्रमुख मार्ग आहेत, जे शहरांमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला जोडतात. सध्या शहरात दोन्हीकडून वाहनांचा प्रवेश होऊन ती वाहने शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत (उदा. रामदेव गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, गणपत गल्ली, रविवार पेठ) येत असल्यामुळे अडथळ्याच्या सर्व कोपऱ्यांवर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होते. यासाठी शहरातील वन वे रस्त्यांची संख्या वाढविण्याबरोबरच शहरात येणार्या आणि बाहेर जाणाऱ्या रस्त्यांचे व्यवस्थित नियोजन केले जावे. मिळालेल्या माहितीनुसार वाहनांची संख्या वाढली असली तरी गेल्या 15 वर्षात शहरात एकही नवा वन वे रस्ता सुरू करण्यात आलेला नाही.
शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी ट्रॅफिक सिग्नल महत्त्वाचे आहेत. बेळगाव शहरात एकूण 9 ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल्स आहेत. मात्र सध्या यापैकी 50 टक्के सिग्नल यंत्रणा बंद पडलेली आहे. तेंव्हा शहरातील सर्व सिग्नल सुरू राहतील याची काळजी घेतली जावी.
याव्यतिरिक्त पहिल्या रेल्वे गेट येथील बॅरिकेड हटवावेत. शहरात ठराविक ठिकाणी हॉकर्स झोन तयार करून तेथे परवानाधारक विक्रेत्यांना व्यापारास परवानगी दिली जावी. रहदारीची समस्या दूर करण्यासाठी देसुर आणि काकती येथे ट्रक टर्मिनल सुरू करावेत.
लुटमारीचे प्रकार थांबविण्यासाठी किणये ते चोर्ला मार्गावर कायमस्वरूपी हायवे पेट्रोलिंग स्क्वाड नियुक्त केले जावे. बाजारपेठेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि शहरात सार्वजनिक तक्रार निवारण केंद्रं सुरू केली जावीत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे निवेदन सादर करतेवेळी सतीश तेंडुलकर यांच्या समवेत शेवंतीलाल शाह, विकास कलघटगी आदी सिटिझन्स कौन्सिलचे अन्य सदस्य उपस्थित होते.