बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या अर्ज भरणा केंद्राच्या 100 मीटर परिसरात 144 कलमान्वये जमा बंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन यांनी मंगळवारी याबाबतचा आदेश जारी केला आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी 16 ते 23 ऑगस्ट या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी 12 केंद्रांची स्थापना करण्यात आली असून या ठिकाणी गर्दी वाढवून कायदा व सुव्यवस्थेसह कोरोना नियमावलीचे उल्लंघन होऊ नये यासाठी जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. जमावबंदीचा निर्बंध सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत लागू असणार आहे. पोलीस आयुक्तांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्यांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे. केंद्राच्या 100 मीटर परिसरात अर्ज दाखल करण्यासाठी येणारे उमेदवार, अधिकारी व कर्मचारी वगळता अन्य कोणालाही प्रवेश असणार नाही. पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. निवडणूक कार्यालय परिसरात सभा, मिरवणुका काढण्यास निर्बंध असतील. परिसरात शस्त्र, लाठीकाठी किंवा स्फोटक वस्तू घेऊन जाण्यास अनुमती असणार नाही. कार्यालय परिसरात जाहिरातबाजी, घोषणाबाजी, ध्वनिवर्धक वापरण्यावर बंदी असणार आहे. याची नोंद घेऊन सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डाॅ. त्यागराजन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.