महानगरपालिका निवडणुकीत तिकीट न देता नाकारण्यात आल्यामुळे भाजप महिला मोर्चा मध्ये सुरुवातीपासून कार्य करत असणाऱ्या अनेक महिलांनी आता आपल्या पक्षा विरोधातच बंड केला आहे.
एका कन्नड वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजप महिला मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी निवड समिती आणि त्यामध्ये लुडबुड करणाऱ्या भाजपच्या महत्त्वाच्या व्यक्तींवर आरोप केला असून त्यांनी आम्हाला पक्षात काम करून घेत असताना तिकीट देण्यास टाळाटाळ केली असल्याची तक्रार केली. यासंदर्भात आपण बंड केले आहे, वरिष्ठ भाजप नेत्यांबरोबर चर्चा करून संबंधितांबद्दल तक्रार केली जाणार आहे. अशी माहिती त्या कन्नड वृत्तवाहिनीला देण्यात आली आहे. भाजप पक्ष महिला मोर्चाच्या माध्यमातून अनेक आमदारकी आणि खासदारकी निवडणुकीत तळागाळात पोहोचविण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी केले. त्यामध्ये असंख्य मराठी भाषिक महिलांचा समावेश आहे.
काही कन्नड भाषिक महिलांचाही यामध्ये समावेश असून त्यांनी पक्षासाठी जीव तोडून काम केले आहे. मात्र जे आमदार खासदार झाले त्यांना आम्ही नगरसेवक होणे मान्य नाही अशी प्रतिक्रिया आज दुर्दैवाने द्यावी लागत असल्याचे या महिलांना सांगायचे आहे. महानगरपालिकेत आपापल्या वॉर्डातून प्रतिनिधित्व करण्यासाठी भाजपकडे तिकिटाची मागणी केली असता तुम्हाला तिकिट मिळेल असे सांगून गाफील ठेवण्यात आले आणि त्यानंतर पक्षातील काही तथाकथित नेत्यांनी तिकीट नाकारले असून हा प्रचंड मोठा अन्याय झाल्याने या महिला नाराज झाल्या आहेत.
या संदर्भात काल खासदार मंगला अंगडी यांच्याशी चर्चा करून काही महिला कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती, भाजपने या वर्षी प्रथमच पक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे सुरुवातीपासून कार्यकर्त्या म्हणून राहणाऱ्या भाजपमधील महिला कार्यकर्त्या पुढे आल्या. त्यांनी निवडणुकीत स्वतः सहभागी होण्याचे स्वप्न पाहिले मात्र हे स्वप्न अर्धवटच राहिले आहे. त्यांना तिकीट नाकारण्यात आल्यामुळे आता मोठी नाराजी पसरली आहे. अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत संबंधित नेत्यांनी ज्यांना तिकिटे दिली व बीफार्म दिले त्यांचे बीफार्म रद्द करून आम्हाला तिकीट देण्यात यावे अशी मागणी यापैकी काही महिलांनी केली असून आता पक्षांतर्गत खलबते वाढली आहेत.
तथाकथित नेत्यांनी फक्त आपल्या मर्जीतील लोकांना तिकीट दिले असून यासाठी सुरुवातीपासून राबलेल्या आणि पक्षाचे अस्तित्व कधीच नसताना पक्षासाठी प्रामाणिक राहिलेल्या लोकांवर मात्र अन्याय केला असल्याचे म्हणणे भाजप महिला कार्यकर्त्या व्यक्त करत आहेत. त्यामुळे या महानगरपालिका निवडणुकीत नाराज तरुण आणि पुरुष कार्यकर्त्यांच्या बरोबरीने महिला कार्यकर्त्यांचा रोषही भाजपने निवडलेल्या उमेदवारांना सोसावा लागणार हे नक्की आहे.
राष्ट्रीय पक्ष मराठी माणसाचा फक्त वापर करत आले आहेत हे आज आम्हाला समजू लागले असून आम्ही पक्ष वाढवण्यासाठी केलेले काम फुकट गेले अशी भावना यापैकी काही महिलांनी बेळगाव live कडे व्यक्त केली आहे.