बेळगाव महानगर पालिकेची आगामी निवडणूक ‘कमळ’ या आपल्या पक्ष चिन्हावर लढवून महापालिकेवर पक्षाची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.भाजपच्या बैठकीत पक्ष चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे.
आगामी बेळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर भाजप कोअर कमिटीच्या आज शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये उपरोक्त निर्णय एकमताने घेण्यात आला. सदर बैठकीस भाजपचे राज्य प्रधान कार्यदर्शी महेश टेंगिनकाई खास उपस्थित होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महापालिका निवडणूक लढविण्याबाबत चर्चा झाली.
यावेळी महेश टेंगिनकाई यांनी बेळगाव महापालिका निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचा आदेश खुद्द राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील यांनीच दिला असल्याचे स्पष्ट केले. यावर बैठकीत सर्वानुमते पक्षाच्या चिन्हावर महापालिका निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
बैठकीस स्थानिक भाजप नेते शशिकांत पाटील, किरण जाधव, एम. बी. जिरली, प्रकाश अक्कलकोट, राजेंद्र हरकुनी, उज्वला बडवानाचे आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपच्या वरिष्ठांनी पक्ष चिन्हावर बेळगाव महापालिका निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
भाजपने प्रभागवार प्रभारी नेमण्याचे काम सुरू झाले केले आहे, अशी माहिती भाजप नेते किरण जाधव यांनी दिली. दरम्यान, भाजपने बी फॉर्म भरून महापालिका निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या ‘कमळ’ या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेणाऱ्या भाजपची त्या दिशेने वाटचाल देखील सुरू झाली आहे.
काँग्रेस गोटामध्ये मात्र याबाबतीत अद्याप तरी सामसूम आहे. तेंव्हा आता महापालिका निवडणुकीच्या बाबतीत काँग्रेस कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.