बेळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप विरोधात बंडखोरी करून पक्षाचा आदेश न पाळता उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या आणि निवडणूक लढविणाऱ्या भाजपच्या 7 सदस्यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
दीपक जमखंडी (प्रभाग क्र. 41), शिवानंद मुगळीहाळ (प्रभाग क्र. 46), गणेश नंदगडकर (प्रभाग क्र. 4), संजय सव्वाशेरी (प्रभाग क्र. 49), आरती पाटोळे (प्रभाग क्र. 19), शिवानंद मुरगोड (प्रभाग क्र. 19) आणि ज्योती भावीकट्टी (प्रभाग क्र. 36) अशी भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्यांची नांवे आहेत.
भारतीय जनता पक्षाने बेळगाव महापालिका निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे अधिकृत उमेदवारांची नांवेही जाहीर केली होती.
तरीही सदर 7 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक रिंगणात उडी घेतली. या पद्धतीने पक्षाचा आदेश न पाळता कारवाई केल्याबद्दल त्यांच्यावर वरीलप्रमाणे हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.