बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्था अर्थात बीम्स हॉस्पिटलमध्ये सध्या म्युकाॅरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगस रोगावरील औषधाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे या रोगाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल त्यांचे नातेवाईक जिल्हा प्रशासन आणि सरकारवर आपली चीड व्यक्त करत आहेत. ब्लॅक फंगसवरील पोसाकोनाझोल हे औषध सध्या बीम्स हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून सदर औषधाचा तात्काळ पुरवठा केला जावा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. ब्लॅक फंगसवरील शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर रुग्णांना 90 दिवसांसाठी पोसाकोनाझोल औषधाच्या गोळ्या लिहून देत आहेत.
ब्लॅक फंगसमुळे अनेक जणांचा आमच्या डोळ्यासमोर मृत्यू झाला आहे. कांही मुलांना या रोगाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही परिस्थिती असताना वैद्यकीय कर्मचारी औषधाच्या गोळ्या उपलब्ध नसल्याचे सांगून आमच्या चिंतेत भर घालत असल्याचे रुग्णांच्या नातलगांचे म्हणणे आहे.
खुल्या बाजारपेठेत पोसाकोनाझोल 10 गोळ्यांच्या ट्रीपसाठी 5,500 रुपये मोजावे लागतात. डॉक्टर तर सांगतात कि शस्त्रक्रियेनंतर 90 दिवस या गोळ्या घेतल्या पाहिजेत. परंतु बाजारातील किंमत लक्षात घेता रुग्णांना फक्त या गोळ्यांसाठी जवळपास 1.5 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे या महागड्या औषधाच्या गोळ्या बाजारात खरेदी करणे आम्हाला परवडणारे नाही.
तेंव्हा प्रशासनाने पोसाकोनाझोल गोळ्या तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी रुग्णांच्या नातलगांनी केली आहे. दरम्यान बीम्स हॉस्पिटलमध्ये सध्या 50 हून अधिक ब्लॅक फंगसचे सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत या हॉस्पिटलमध्ये 190 हून अधिक ब्लॅक फंगसग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.