विद्युत आणि कृषी खात्याच्या खासगीकरणाला तीव्र विरोध दर्शवत कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून अर्धनग्न लोटांगण आंदोलन छेडण्यात आले.
केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी कायदे करून शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहे. देशात नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू असतानाच आता सरकारने विद्युत आणि कृषी खात्याचे खाजगीकरण करण्याचा घाट रचला आहे.
याच्या विरोधात कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेनेतर्फे आज शहरात आंदोलन छेडण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी कित्तूर चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात हातात हिरवे झेंडे आणि खांद्यावर हिरव्या शाली घेऊन शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चातील कांही शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन कित्तूर चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण घालून खासगीकरणाला विरोध दर्शविला.
मोर्चातील अर्धनग्न अवस्थेतील शेतकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मोर्चादरम्यान जय जवान, जय किसान या घोषणेसह सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाची सांगता होऊन जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर आंदोलनात बेळगाव शहर तालुका आणि जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.
याप्रसंगी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना शेतकरी नेते राजू मरवे म्हणाले की, राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे जे धोरण आखत आहे, त्याला आमचा तीव्र विरोध आहे. त्यांचे हे षड्यंत्र कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेना धुळीला मिळविल्याशिवाय राहणार नाही.
विद्युत आणि कृषी खात्याचे खाजगीकरण करून देशातील शेतकरी मातीमोल होणार आहे हे सरकारला कसे समजत नाही? तेंव्हा केंद्र व राज्य सरकारने विद्युत व कृषी खात्याच्या खासगीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अन्यथा भविष्यात राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडून कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेना सरकारला जेरीस आणले शिवाय गप्प बसणार नाही, असेही मरवे यांनी स्पष्ट केले