राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील बेळगावसह तीन महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे. जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीसाठी आवश्यक सर्व तयारी केली असून येत्या सोमवारी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.
बेळगाव महापालिकेच्या 58 प्रभागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनद्वारे मतदान होणार आहे. प्रशासनाने यापूर्वीच निवडणुकीची मतदार यादी जाहीर केली आहे. निवडणुकीची मतमोजणी कॅम्प येथील बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये होणार आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. निवडणूक काळात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल. सीमावर्ती भागातील चेकपोस्टवर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे असे सांगून आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून सोमवार दि 16 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी निवडणुकीची अधिसूचना जारी करणार आहेत.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट ही असणार आहे. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट ही असणार आहे. निवडणुकीचे मतदान 3 सप्टेंबर रोजी होणार असून 6 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.