मतदार याद्यांबाबतच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन बेळगाव महानगरपालिका निवडणुकीचे मतदान अवघ्या तीन दिवसांवर आले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार याद्यांची चौकशी सुरू केली आहे.
मतदार याद्याबाबतच्या अनेक तक्रारी जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे दाखल झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची चौकशी सुरू केली आहे. परिणामी मतदार यादी तयार करणाऱ्या महापालिकेच्या महसूल व निवडणूक विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. काल सोमवारी महापालिकेचे अधिकारी मतदार यादीशी संबंधित माहिती घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. त्यावेळी मतदार यादी तयार करण्याचे काम कोणी केले? अशी विचारणा जिल्हाधिकाऱ्यांनी केल्याचे कळते. याशिवाय मतदार यादी संदर्भात काल सायंकाळी महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी ही बैठक घेतल्यामुळे हे प्रकरण कोणाला भोवणार याचीच चर्चा महापालिकेत सुरू आहे. महापालिकेच्या महसूल विभागाने प्रभागनिहाय मतदार याद्या तयार केल्या होत्या. तथापी ते काम योग्य पद्धतीने झाले नव्हते हे आता उघड झाले आहे.
प्रभाग निहाय मतदार यादी तयार करताना त्यातून अनेक नांवे गायब झाली आहेत. एकाच घरातील मतदारांची नांवे तीन वेगवेगळ्या प्रभागात समाविष्ट केली आहेत. कांही प्रभागांच्या मतदार यादीत केवळ मतदारांचे छायाचित्रे आहेत, मात्र मतदारांची नांवेच नाहीत. कांही प्रभागात तेथे वास्तव्य नसलेल्या शेकडो जणांची नांवे मतदार यादीत समाविष्ट केली आहेत. ज्योतीनगर परिसरातील तब्बल 1500 नांवे मतदार यादीतून गायब आहेत. महापालिका निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचे असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून त्यांनी चौकशीचे आदेश दिल्यामुळे आता संबंधित अधिकारी व कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.