बेळगाव शहराची प्रभाग पुनर्रचना व प्रभाग आरक्षणा विरोधातील पर्यायाने महापालिका निवडणुकी विरोधातील याचिकेवरील आज सोमवारी होणारी सुनावणी दीड तासाच्या युक्तिवादानंतर न्यायाधीशांनी वेळेअभावी येत्या गुरुवार दि. 19 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्याची माहिती याचिकाकर्ते व माजी उपमहापौर ॲड. धनराज गवळी यांनी दिली.
पुनर्रचना व आरक्षणा विरोधातील याचिका प्रलंबित असताना राज्य निवडणूक आयोगाने बेळगाव महापालिकेची निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी मेमोच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यावर आज न्यायालयात जवळपास दीड तास युक्तिवाद चालला अखेर वेळेअभावी न्यायालयाने सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलली. महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी राज्य सरकारकडूनही प्रयत्न सुरू आहेत. बेंगलोर उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. तो मुद्दा आणि आरक्षण व प्रभाग पुनर्रचनेसंदर्भातील याचिकाकर्त्यांचे मुद्दे लक्षात घेऊन येत्या गुरुवारी दुपारी 2:30 वाजता तपशीलवार चर्चा केली जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे आज न्यायालयाने स्पष्ट केले असल्याची माहिती ॲड. गवळी यांनी दिली.
एकंदर बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीचे भवितव्य अद्याप सुनिश्चित झाले नाही. धारवाड खंडपीठाचा निर्णय गुरुवारपर्यंत लांबणीवर पडल्यामुळे आता प्रभाग पुनर्रचना व प्रभाग आरक्षण यासंदर्भातील याचिका आणि पर्यायाने निवडणुकीसंदर्भातील गुरुवारी होणाऱ्या सुनावणीकडे इच्छुक उमेदवारांसह शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना निवडणूक नको, अशी मागणी विविध संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे. राज्य शासनाकडूनही निवडणूक लांबणीवर टाकण्याची मागणी होत आहे. कोरोना संदर्भातील निर्बंध आणखी कडक करण्याचे नियोजन सुरू असताना निवडणूक जाहीर झाल्याने विरोधाचा सूर वाढला आहे.