महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक होण्याची स्वप्न बघणाऱ्या आणि निवड प्रक्रियेत नाकारल्या गेलेल्या भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांची नाराजी वाढली आहे. उमेदवार निवड करणाऱ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला न्याय मिळाला नाही अशी तक्रार अनेक भाजपमधील कार्यकर्ते व्यक्त करत असून आज त्यांनी आपली नाराजी खासदार मंगला अंगडी यांच्याकडे मांडली आहे.
आम्ही अनेक वर्षापासून भाजपमध्ये सेवा करत आलो आहोत .भाजपने पक्ष वाढवताना सामान्य कार्यकर्त्यांचा विचार करणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त करून आम्हाला उमेदवारी का नाही याचे उत्तर द्या. निवड प्रक्रियेत असलेल्या व्यक्तींची चौकशी करा.फक्त आपल्या खास लोकांनाच उमेदवारी देणाऱ्यांवर कारवाई करा. अशी मागणी अनेक महिला आणि तरुण कार्यकर्त्यांनी मंगला अंगडी यांच्याकडे केली.
यावेळी उमेदवारी देताना अनेक जण इच्छुक असतात त्यामुळे नाराजी होत असते आपण नाराज न होता पक्षासाठी काम करावे. पुढे त्याचा नक्कीच फायदा होईल. असे सांगून मंगला अंगडी यांनी त्यांना परत पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यात अपयश आले असल्याचे बोलले जात आहे .
यावर्षी प्रथमच महानगरपालिका निवडणुकीत भाजपने पक्ष म्हणून सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक जण पुढे आले. मात्र ते नाराज झाल्यामुळे याचा फटका भाजपने निवडलेल्या उमेदवारांना होणार असल्याचे दिसत आहे. नाराज उमेदवार मराठी असल्यास इतर मराठी उमेदवारांना आणि कन्नड असल्यास इतर कन्नड उमेदवारांना आपली मते फिरवू शकतात अशी शक्यता सध्या भाजपच्या बाबतीत निर्माण झाली असल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे .
निवड प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तींच्या बद्दल सर्वात मोठी नाराजी असल्याने उमेदवारांनी आपली नाराजी वरिष्ठ पक्ष नेतृत्वाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बेळगाव live ला मिळाली आहे.