बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत यावेळी राष्ट्रीय पक्ष बाजी मारणार की महाराष्ट्र एकीकरण समितीचा चाळीस प्लस चा फॉर्म्युला कामाला येणार? याकडे संपूर्ण कर्नाटकाचे आणि पर्यायाने महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यावेळी मनपा निवडणुकीत सर्वप्रथम दाखल झालेल्या राष्ट्रीय पक्षांनी आपल्या विजयाचे नियोजन करताना सर्व तंत्रे अंमलात आणण्यास सुरुवात केलेली असताना मराठी माणसाचे अस्तित्व ठरवणारी ही निवडणूक ठरणार आहे.मतदार राजाचा फैसला काय असेल यावरच आता विजय चळवळीचा की पक्षांचा हे गणित ठरणार आहे.
बेळगाव शहरातील 58 वॉर्डाची पुनर्रचना करण्याचा घाट दोन वर्षांपूर्वी घातला गेला. वॉर्ड रचना बदलून कर्नाटक नगरविकास खात्याने प्रत्येक वॉर्डाचे आरक्षणही बदलले. प्रस्थापित पुढाऱ्यांनी मनपावर असलेली पारंपरिक मराठी माणसाची सत्ता मोडीत काढून आपले वर्चस्व निर्माण करण्याचा एक प्रयत्न केला. याला काही माजी नगरसेवकांनी न्यायालयात खेचले पण तरीही हे मनसुबे उधळले गेले नाहीत. याचीच परिणती म्हणून निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली.
कर्नाटकात सत्तेत असलेला भाजप आणि विरोधी तरीही प्रबळ असलेला काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकाला शड्डू ठोकत या निवडणुकीत प्रवेश केला आहे. या दोन्ही पक्षांनी आपापल्या पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांची निवड या 58 वॉर्डांसाठी केली. यातच दिल्ली सरकार च्या नावे सर्व देशभर आपले मार्केटिंग करणारा आम आदमी पक्षही संपूर्ण 58 वॉर्डात नवे चेहरे घेऊन दाखल झाला आहे. काँग्रेस मधील नाराज मुस्लिमांना हैद्राबाद च्या एम आय एम ने साथ दिली आहे तर हिंदू नाराज समितीच्या साथीला उभे आहेत. शिवसेनेने तर नेहमीची आपली सीमाभागात समितीच्या झेंड्याखाली हीच भूमिका कायम ठेवली आहे.
बेकीला एकीचे उत्तर
महाराष्ट्र एकीकरण समिती हा पक्ष नसून चळवळ आहे. यामुळे अनेक कार्यकर्ते आहेत. प्रत्येकालाच नगरसेवक व्हायचे आहे. अशा स्थितीत प्रत्येक वॉर्डात अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या मराठी उमेदवारातील बेकीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने एकीचे उत्तर दिले आहे.
मराठी अर्थात समितीचा उमेदवार निवडण्याचा अधिकार प्रत्येक वॉर्डातील पंच मंडळींना देण्यात आल्याने वातावरण शांत झाले आहे. पंच मंडळ ठरवेल तो समितीचा अधिकृत उमेदवार या सूत्राने नागरीकातील संभ्रम दूर झाला आहे. यामुळे राष्ट्रीय पक्षांचे सर्वभाषिक विरुद्ध समितीचे मराठी अशी निवडणूक सध्या होणार आहे.
चाळीस प्लस हा फॉर्म्युला ठेवून म ए समितीची घोडदौड सुरू आहे तर यासाठी सुरुवातीपासून सीमाप्रश्नी महाराष्ट्रात सहभागी होण्याच्या भूमिकेत सहभागी मुस्लिम मतदारांशी हातमिळवणी सुरू झाली आहे. मराठी आणि मुस्लिम ऐक्याच्या या वातावरणाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला असून यामुळे वातावरण तापले आहे. काही वॉर्डात नाराज भाजप उमेदवार समितीच्या साथीला येत असल्याने निवडणुकीचा माहोल तप्त होऊ लागला असून एकंदर तापलेल्या भट्टीतून निकाल काय बाहेर पडतो हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे