बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आता लवकरच निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि निवडणुकीतील इच्छुकांची भाऊगर्दी सुद्धा दिसणार आहे. प्रत्येकालाच आपापल्या वॉर्डात नगरसेवक होण्याचे स्वप्न असते मात्र नागरिक कोणाला निवडणार हा मोठा प्रश्न आहे.
कोरोनाच्या काळात घराघरात जाऊन धावलेल्या आणि राबलेल्या कामगार कार्यकर्त्यांना निवडून देणार की महानगरपालिकेत प्रस्थापित ठरलेल्या मात्र मदतीला न आलेल्या व्यक्तींना स्थान मिळणार हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे .
निवडणूक म्हटली की इच्छूक आलेच. उमेदवार लोकांच्या अनेक आश्वासनांच्या याद्या आल्या. राजकीय पक्षांचे उमेदवार आले, चळवळीतील उमेदवार आले. या साऱ्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत यावेळी वर्चस्व कोणाचे राहणार याची जोरदार चर्चा आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या मतदारसंघांची फोड त्यादृष्टीने करण्यात आल्याचा आरोप यापूर्वी झाला होता.
अनेक नगरसेवकांनी हे आपल्याला मान्य नसल्याचे सांगून न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयीन सूचनेनुसार अनेक बदल झाले. महानगरपालिकेची निवडणूक होणार की नाही ? लवकर होणार तर जुन्या वॉर्डांच्या माध्यमातून होणार की नवीन वॉर्डांच्या असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या सार्या पार्श्वभूमीवर अखेर निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता घाई गडबडी ला सुरुवात होणार आहे. महानगरपालिकेचा नगरसेवक असो किंवा महापौर हा तळागाळातल्या जनतेच्या मदतीला धावून जाणारा आणि तळागाळातील जनतेच्या मनातल्या उमेदवार असतो. असे आजवर झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. विकास कामे असोत किंवा वेगवेगळ्या अडचणी सोडविणे असो या साऱ्यांसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांनाच बेळगावच्या जनतेने आपलेसे केले आहे. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीत ही त्यापेक्षा वेगळे काही होणार नाही. असेच वाटते.
मागील वर्षी आणि यंदा जसजशी निवडणूक पुढे पुढे ढकलत चालली होती त्याच पद्धतीने कोरोना चा विळखा अधिकच घट्ट होत गेला. या काळात ऑक्सीजन सिलेंडर, घरोघरी औषधे, घराघरात अडकलेल्या रुग्णांना घरातून बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल करणारे कार्यकर्ते आणि इतर अनेकांची फळी निर्माण झाली. यापूर्वी कधीही निवडणुकीत सहभागी न झालेल्यापैकी अनेक तरुण कार्यकर्ते नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे आले आणि त्यांच्याकडे भावी नगरसेवक म्हणून पाहण्याची एक वेगळी दृष्टी समाजाला मिळाली.
त्या वेळच्या निवडणुकीत अशा कार्यकर्त्यांनी स्वतः सहभागी होऊन निवडणूक लढवणार की फक्त सेवा करत राहणार हाही प्रश्न आहे. सेवारत कार्यकर्ते राजकारणात येत नाहीत हे चित्र असले तरी सध्या 58 वॉर्डांचा यांचा विचार केला तर किमान कोरोना काळात तयार झालेले नवे 25 कार्यकर्ते तरी प्रस्थापित उमेदवारांना आव्हान ठरणार की काय ?असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
माजी नगरसेवकांपैकी अनेकांनी आपले सेवाभावाचे उद्दिष्ट कायम ठेवले आहे. मात्र ही संख्या कमी आहे.फक्त निवडणुकीपूरते बाहेर पडणारे प्रस्थापित अधिक झाले आहेत. यामुळेच यावेळच्या निवडणुकीचे महत्व वेगळे असणार असून त्यामध्ये कोरोना काळात केलेल्या कामाची एक अटसुद्धा राहणार आहे.