मी ..नंतर… तू पहिला… .. !!!अशीच अवस्था सध्या काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांची झाली आहे. बेळगाव महानगरपालिका निवडणूक अनेक दशकांनंतर राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत आहे.ही निवडणूक राजकीय पक्षाच्या माध्यमातून घेण्यासाठी पक्षांना आपले उमेदवार ठरवताना मात्र अनेक आव्हाने पेलावे लागत आहेत.
इच्छूकांची गर्दी आणि विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडे काय असेल याकडे लक्ष यामुळे आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यास ना काँग्रेस पुढे ना भाजप. पाककला स्पर्धेत प्रतिस्पर्धी कसा ताट सजवतो ते बघून मग आपले ताट मांडले जाते,तसाच प्रकार बघायला मिळत आहे. एकूण काय तर दुसऱ्याच्या ताटात काय वाढले जाणार याकडे दोन्ही पक्ष लक्ष ठेऊन आहेत.
बेळगाव महानगर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही उमेदवार जाहीर करणार आहेत. भाजप काँग्रेसची यादी जाहीर करण्याची वाट पाहत आहे.
भाजपची यादी जाहीर होण्याची काँग्रेस वाट पाहत आहे. दोन्ही पक्ष या प्रकरणाकडे आपापल्या डावपेचात ठाम असल्याने दोन्ही पक्षातील इच्छुकांची वाट लागली आहे. पक्षाचे तिकीट मिळवणे म्हणजे काय दिव्य असते हे आता यापूर्वी अपक्ष म्हणून उभारणाऱ्या उमेदवारांना कळत आहे.
भाजप शनिवारी रात्री उमेदवारांची यादी जाहीर करेल अशी आशा होती. पण तसे झाले नाही. काँग्रेसनेही आपली यादी झाकून ठेवली. अशा प्रकारे दोन्ही पक्षांचे इच्छुक शनिवारी रात्री झोपलेले नाहीत.
काँग्रेस नेत्यांनी सांगितले की ते सोमवारी दुपारपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर करतील.
भाजपने एक पाऊल पुढे टाकून इच्छुकांची भेट घेतली आहे. उमेदवारांची यादी जाहीर केली जात नाही जोपर्यंत दररोज बैठकांची मालिका होत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती ने तिकीट नाकारलेल्या नाराज गटाला काँग्रेस आणि भाजप संधी देणार अशी एक वावडी उठली असून त्यामुळे भाजप आणि काँग्रेस मध्ये पूर्वीपासून असलेल्या इच्छूकांची गाळण उडाली आहे.