केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देशातील छोटी -छोटी गावं आणि शहरांना नागरी विमान वाहतुकीच्या नकाशावर आणण्याचे ‘हवाई चप्पल से हवाई जहाज’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आरसीएस -उडान योजनेमुळे कसे प्रत्यक्षात उतरत आहे, यावर एक लेख लिहिला असून त्यामध्ये बेळगाव विमानतळाचा आवर्जून उल्लेख केला आहे.
बेळगाव विमानतळाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक केंद्र असणाऱ्या बेळगावला ये-जा करता यावी यासाठी सुलभ प्रवासाची सोय करून दिली आहे. कार्गो विमान वाहतुकीसाठी आता या विमानतळाचा वापर केला जात असून लवकरच येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले जात आहे, हे सर्व अवघ्या कांही वर्षात घडत आहे.
उडाणने पहिल्यांदा विमान प्रवास करणाऱ्यांसाठी प्रथम दर्जा रेल्वे तिकिटाच्या दरात विमानाचे तिकीट उपलब्ध केले आहे. ज्यामुळे प्रादेशिक पातळीवर विमान प्रवासाला प्रोत्साहन मिळत असून आर्थिक प्रगती ही होत आहे. गेल्या सुमारे 4 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या उडाण योजनेमुळे हवाई संपर्क देशाच्या कानाकोपर्यात पोहोचला आहे, असे पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या लेखाचा संदर्भ घेऊन म्हंटले आहे.
गेल्या 4 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशात मजबूत आणि परवडणारी प्रादेशिक विमान वाहतूक व्यवस्था प्रस्थापित करण्याचे महत्वकांशी कार्य करत आहे. यामध्ये उडान योजना हवाई संपर्क दुर्लक्षित प्रादेशिक प्रदेशापर्यंत पोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे असे केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी आपल्या लेखात लिहिल्याचे पीएमओने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.