राज्याच्या सीमावर्ती जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती पाहून विकेंड लॉक डाऊन हटवायचा की नाही? याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
म्हैसूर येथे आज सोमवारी कोरोना परिस्थितीसंदर्भात जिल्हास्तरीय बैठक पार पाडल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री बोम्मई यांनी कोविड लॉकडाऊन, कोरोना परिस्थिती हाताळणी आणि लाॅक डाऊन नियम अंमलबजावणी यासंदर्भात पत्रकारांना माहिती दिली. देवाच्या दयेने कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, जर का ही लाट आली तर पुनश्च पूर्वीप्रमाणे कठोर उपाययोजना आणि नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मी सर्व मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. तज्ञ समितीच्या सल्ल्यानुसार केरळ व महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्याच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये सर्व ती खबरदारी -दक्षता घेतली जात आहे. याठिकाणी नियमांची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. अधिकारीवर्ग जातीने चेकपोस्टच्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून कार्यरत आहे. चेकपोस्ट वरील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असले पाहिजे अशी सक्त सूचना देण्यात आली आहे. सीमावर्ती जिल्ह्यांमधील कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन वीकेंड लाॅक डाऊन मागे घ्यायचा की कायम ठेवायचा? याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे 65 लाख डोस येणार आहेत. त्याचप्रमाणे येत्या कांही दिवसात 1 कोटी डोस मागविण्याचा प्रस्ताव आहे. पुढील महिन्यात लसीचे 1.5 कोटी डोस आल्यास दिवसाला 5 लाख लोकांचे लसीकरण शक्य होणार आहे, असेही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. याप्रसंगी मंत्री एस. टी. सोमशेखर, भैरती बसवराज, व्ही. सोमण्णा, मुरुगेश निराणी, डॉ. के. सुधाकर, डॉ. नारायणगौडा, मनिरत्नं आदी उपस्थित होते.