मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बुधवारी 29 मंत्री महोदयांना आपल्या कॅबिनेट मध्ये समाविष्ट करून घेतले. मुख्यमंत्री पदाचा भार स्वीकारल्यानंतर आठवड्याने त्यांनी आपले नवे मंत्रिमंडळ स्थापन केले.
कॅबिनेट निश्चित करण्यासाठी त्यांचा जास्तीतजास्त वेळ दिल्लीत गेला. आता बनलेले 29 जणांचे कॅबिनेट हे राजकीय दबावतंत्र आणि राजकारणाचे प्रतीक असणार आहे.
बोम्माई यांच्या कॅबिनेट मध्ये वरिष्ठ नेत्यांना बाहेरचे दार दाखविण्यात येईल असे वातावरण तयार झाले यामुळे पक्षश्रेष्टींना नेमके काय अपेक्षित आहे याची चर्चा होत होती.
मात्र आता फक्त सहाच चेहरे नवीन असून उर्वरित 23 चेहरे जुनेच अर्थात येडीयुरप्पाच्याच कॅबिनेट मधील आहेत. यामुळे या कबीनेटवर येडीयुरप्पा यांचाच शिक्का असल्याची चर्चा आहे.
नव्या मुख्यमंत्र्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येणार असे एक चित्र निर्माण झाले आहे. मागील कबीनेटमध्ये असलेली उपमुख्यमंत्री पदे यावेळी वगळण्यात आली आहेत. केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला हा निर्णय अनेक इच्छूकांसाठी त्रासदायक ठरला आहे.
एकूण मंत्रीमंडळात फक्त सात जण मूळ भाजपचे किंवा संघ संस्कारातून आलेले आहेत. त्यामध्ये के एस ईश्वरप्पा, आरग जानेनांद्र, एस अंगारा, व्ही सुनील कुमार, आर अशोक, बी सी नागेश आणि कोटा श्रीनिवास पुजारी यांचा समावेश असून बाकीचे बाहेरून आयात झालेले अर्थात इतर ठिकाणी राजकीय करियरची सुरुवात करून नंतर भगव्या वादळात सहभागी झालेले आहेत. स्वतः मुख्यमंत्रीही त्याच प्रकारात मोडतात हे विशेष आहे.
काँग्रेस जेडीएस चे सरकार पाडवून भाजप मध्ये सहभागी झालेल्या दहा जणांचा या कॅबिनेट मध्ये समावेश झाला आहे. मेरा नंबर कब आयेगा म्हणणाऱ्यांना यावेळी संधी देऊन शांत करण्यात आले आहे.
उत्तर कर्नाटकात अनेकांना आपला नंबर लागेल अशी अपेक्षा होती. मंत्र्यांची नावे जाहीर होण्यापूर्वीच अनेकांनी विजयाची तयारी केली होती. पण कुणाला मंत्री करायचे याचा निर्णय दिल्लीत झाला असल्याने अनेकजण निराश झाले आहेत.
जगदीश शेट्टर यांनी स्वतःच कॅबिनेट मधून बाहेर राहणे पसंत केले. सी पी योगेश्वर, अरविंद लिंबावळी, एस सुरेशकुमार, श्रीमंत पाटील, आर शंकर आणि लक्ष्मण सवदी यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांना सावरणे आता स्थानिक नेत्यांना अवघड जाण्याची शक्यता आहे.