बनावट खताची विक्री करणाऱ्या कोकटनुर (ता. अथणी) गावातील एका कृषी सेवा केंद्रासह केंद्राच्या गोदामावर छापा टाकून बेळगाव कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी बनावट खताची 171 पोती जप्त केली. याप्रकरणी कृषी सेवा केंद्राच्या चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून गोदामाला सील ठोकण्यात आले आहे.
कर्नाटक सरकारच्या कृषी महासंचालक जागृती कोशाच्या बेळगाव कृषी विभागाने कोकटनुर (ता. अथणी) गावातील कल्लय्या मठपती याच्या वीरभद्रेश्वर कृषी सेवा केंद्रासह गोदामावर धाड टाकून आसपासच्या गावातील शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात येत असलेला बनावट खतांचा साठा जप्त करून गोदामाला सील ठोकले.
मठपती याच्या केंद्रातून फॅक्ट कंपनीच्या नकली अमोनियम सल्फेट खताची विक्री केली जात होती. त्याचप्रमाणे सदर खताची सरकारने ठरवून दिलेली 50 किलोच्या एका पोत्याची किंमत 850 रुपये इतकी असताना वीरभद्रेश्वर कृषी सेवा केंद्रातून 1100 रुपये दराने या खताची विक्री केली जात होती. याबाबतची माहिती मिळताच उपरोक्त कारवाई करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या पोत्यांमधील खतांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत धाडण्यात आले असून खत नियंत्रण कायद्यानुसार कल्लय्या मठपती कारवाई करण्यात आली आहे.
बेळगाव कृषी खात्याने केलेल्या उपरोक्त कारवाईत सहाय्यक कृषी संचालक एम. एम. कीणगी, आर. बी. पाटील, श्रीमती सुप्रिता अंगडी, कृषी अधिकारी एम. व्ही. कडपट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सहभाग होता.