अंगणवाडी सेविका आणि मदतनीस वर्गाच्या मागण्यांकडे सरकार वेळेत लक्ष देत नाही हे दिसून येत आहे. सेवाज्येष्ठतेच्या आधारावर वेतन द्यावे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी कार्यकर्त्यांनी पुकारलेले
बेमुदत उपोषण बेळगावात आज चौथ्या दिवशीही सुरूच राहिले.
अंगणवाडी कार्यकर्त्यांना सेवाज्येष्ठतेच्या आधारावर वेतन द्यावे, महिला व बालकल्याण खात्याने शिफारस केलेले ३३९,४८ कोटी रु. अनुदान मंजूर करावे, खात्यात झालेल्या कथित अंडीवाटप घोटाळ्याची चौकशी करावी आणि खात्यामार्फतच अंडीवाटप करावे, कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना अंगणवाडी कार्यकर्त्यां किंवा सहायक नेमावे, कोरोना योद्धा म्हणून कार्य करताना कोरोनाने निधन झालेल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या कुटुंबाला ३० लाख रु. भरपाई द्यावी या व अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी कार्यकर्त्यांनी बेळगावात बेमुदत आंदोलन छेडले आहे.
‘सिटू’च्या नेतृत्वाखालील गुरुवारी चौथ्या दिवशीही हे आंदोलन सुरूच राहिले.अंगणवाडी कार्यकर्त्यांनी शिवाजीनगरातील महिला व बालकल्याण खात्याच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी बोलताना अंगणवाडी कार्यकर्त्यांचे सिटूचे नेते जैनेखान यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारकडून अंगणवाडी कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात आहे.
अंगणवाडी कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत कमी वेतनात सेवा बजावली आहे. कोरोना संकटात जनजागृती व लसीकरणासाठी जीव धोक्यात घालून काम केले आहे. कोरोनाकाळात अंगणवाडी कार्यकर्त्यांवर घोषणांची खैरात केलेल्या सरकारने आमच्या मागण्यांकडे मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. पंतप्रधान मोदी ‘मन की बात’मधून मोठी आश्वासने देतात. पण प्रत्यक्षात त्यांची पूर्तता करत नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणं समान काम, समान वेतन धोरण लागू करावे अशी मागणी त्यांनी केली.
जी. व्ही. कोलकार, डी. डी. पुजारी, गोदावरी रामापुरी, सी. एस. मगदूम,चन्नम्मा गडकरी, एस. एम. मुलशेट्टी यांच्यासह अनेक अंगणवाडी कार्यकर्त्यांनी या निदर्शनात भाग घेतला.
लवकरात लवकर या मागण्यांची पूर्तता न केल्यास राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.