बेळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महापालिका कार्यक्षेत्रात निवडणूक आचार संहिता लागू असताना एक व्यक्ती बंदूक घेऊन शहरात खुलेआम फिरल्याची घटना खडेबाजार पोलीस स्थानक व्याप्तीत घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सध्या महापालिका निवडणूक आचारसंहिता लागू असताना आज शुक्रवारी सकाळी शहरातील खडेबाजार येथे एक व्यक्ती खुलेआम बंदूक घेऊन वावरत असल्याचे आढळून आले आहे. याबाबतचा व्हिडिओही व्हायरल झाल्यामुळे सतर्क झालेल्या पोलिसांनी तपास हाती घेतला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खाजगी परवानाधारक शस्त्र धारकांनी आपली शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्याचा आदेश यापूर्वीच काढण्यात आला आहे. त्यानुसार परवानाधारकांनी आपली शस्त्रे जमा केली असताना ग्रामीण भागातून शहरात आलेली एक व्यक्ती कमरेला बंदूक बांधून फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली आहे.
सदर व्यक्ती देसुर येथील असल्याचे समजते. निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी महापालिका कार्यक्षेत्र पुरती मर्यादित आहे. मात्र ग्रामीण भागातील संबंधित व्यक्तीला त्याची कल्पना नसल्यामुळे हा प्रकार घडला असावा असा कयास आहे. खडेबाजार पोलीस संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहेत.