कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा फटका बसलेल्या कर्नाटकातील नागरिकांना आता आणखी एक भीतीदायक बातमी ऐकायला मिळत आहे. कोरोना संदर्भातील कर्नाटक सरकारच्या सल्लागार समितीचे आणि तज्ञ समितीचे प्रमुख असलेले नारायण हेल्थ इस्पितळाचे डॉक्टर देवीप्रसाद शेट्टी यांनी ही भीती व्यक्त केली असून आता दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यात येणार असल्याचे त्यांनी राज्य सरकारला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. आपण जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट लवकर येऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
यासाठी नागरिकांनी ही लाट येऊ नये म्हणून सर्व प्रकारच्या सुरक्षा नियमांचे पालन करण्याची गरज आहे , असेही त्यांनी म्हटले आहे. बेंगलोर मध्ये व्हॅक्सिनेशन ऑन व्हील्स या फिरत्या लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही भीती व्यक्त केली. खेडेगावांमध्ये देखील लसीकरणाचे उद्दीष्ट आहे त्यामुळे राज्यात पुढील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू होईल. शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना लस देण्यात येत आहे. पाच सप्टेंबर पर्यंत दोन कोटी लसी केंद्र सरकारकडून मिळाले असून त्या दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कोरोना पासून रक्षण करण्यासाठी सर्व प्रकारचे नियम पाळण्याची गरज आहे. त्यामुळे लसीकरण करून घेण्याबरोबरच मास्क आणि सुरक्षित अंतराची काळजी घ्यावी लागणार आहे. गणेशोत्सव आणि इतर सणात सुरक्षित अंतर करण्याची गरज आहे. अन्यथा धोका वाढणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच कोरोना संदर्भात सरकारला मार्गदर्शन केले असून त्यांनी व्यक्त केलेल्या शक्यता आजपर्यंत खऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येण्याची त्यांनी व्यक्त केलेली भीती लक्षात घेऊन नागरिकांनी सुरक्षा बाळगण्याची गरज आहे