कर्नाटक राज्यातील एक मोठी बाजारपेठ आणि मोठी उलाढाल होणारे एपीएमसी मार्केट साऱ्यांनाच परिचित आहे. मात्र या मार्केटला आता पाण्याचे ग्रहण लागले असून दहा ते पंधरा दिवसातून एकदा पाणी सोडण्यात येत असल्याने व्यापारी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.
परिणामी याचा फटका बाहेरून येणाऱ्या नागरिकांना अधिक बसतो. मागिल वेळी रस्त्याची कामे करण्यात येत असताना येथील पाईप फुटून तब्बल दीड ते दोन महिने पाणीपुरवठा बंद झाला होता. आता पुन्हा हीच समस्या वारंवार उद्भवू लागली आहे. येथील एपीएमसी प्रशासन साफ दुर्लक्ष करत असून याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
एपीएमसी मध्ये एक जलकुंभ आहे. त्या ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने एपीएमसी मध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचे दिसून येत आहे. जर जलकुंभ भरून सुरळीत पाणीपुरवठा केल्यास समस्या निर्माण होणार नाही. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करून नागरिकांची हेळसांड करताना दिसत आहे. याबाबत वारंवार तक्रारी आणि निवेदने देण्यात आली आहेत. मात्र एपीएमसी प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
पाणी नसल्याने बाहेरील हॉटेल्सवर अनेकांना अवलंबून रहावे लागत आहे. दरम्यान कोरोना काळात सर्वच व्यवहार बंद असल्याने अंतर्गत भागात काम करणारे हमाल व्यापारी वर्ग आणि भाजी मार्केटमध्ये ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे यापुढे तरी एपीएमसी प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.
दरम्यान एपीएमसीमध्ये ठिकठिकाणी टाकी उभी करण्यात आली आहे. या टाक्यांमध्ये पाणीच नसते. त्यामुळे टाक्यांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. जर यामध्ये पाणीच सोडायचे नसेल तर ती उभे कशाला करायची असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे एपीएमसी प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.