गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जक्कीनहोंड – इंद्रप्रस्थनगर वसाहतीमध्ये पुन्हा 2019 सालच्या पूर परिस्थितीची पुनरावृत्ती झाली असून संपूर्ण वसाहत जलमय झाली आहे.
गीरे दोन दिवसापासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे जक्कीनहोंड असलेल्या इंद्रप्रस्थनगर वसाहतीमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे येथील सर्व रस्ते पाण्याखाली गेले असून गुडघाभर पाण्यात या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे.
येथील यशोदा हॉस्पिटलमधील एका गर्भवती महिलेच्या मदतीला धावून जाताना जायन्ट्स ग्रुपच्या (मेन) मदन बामणे, सुनिल मुतगेकर व प्रतिक गुरव या सदस्यांनी अग्निशामक दल जवानांच्या मदतीने तिला पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.
इंद्रप्रस्थनगरातील रस्ते पाण्याखाली जाण्याबरोबरच जवळपास सर्व घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. काहींच्या घरात काहींच्या उंबर्यापर्यंत पुराचे पाणी आल्यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांची तारांबळ उडाली असून त्यांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. या ठिकाणचा सुप्रसिद्ध जक्कीन होंडा तलाव पूर्णपणे पुराच्या पाण्यात अदृश्य झाला आहे. या तलावाचे फक्त चार कोपरेच पाण्याबाहेर दिसत आहेत.
फार पूर्वी या ठिकाणी शेती आणि मोठा तलाव होता. मिळालेल्या माहितीनुसार तत्कालीन तज्ञांनी याठिकाणी भु -गर्भाखाली मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्त्रोत असल्यामुळे येथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये तसा सल्ला दिला होता.
तथापि हा सल्ला धाब्यावर बसून कालांतराने या ठिकाणी वसाहत उभारण्यात आली आहे. याचे दुष्परिणाम गेल्या 2019 साली येथील रहिवाशांना अनुभवास आले होते. त्यावेळी देखील या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली आहे.