बेळगाव शहरानजीकच्या वंटमुरी घाटात काल सोमवारी रात्री घडलेल्या भीषण तिहेरी अपघातात दोघे जण ठार झाले आहेत अपघातात ट्रकचा चुराडा झाला असून कंटेनर उलटून पडला.
बेळगाव पासून 20 किलोमीटर अंतरावरील घाटातील मुंबई इंडियन ढाब्या नजीक काल रात्री बाराच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. राजेंद्र आर. डोईफोडे (वय 36 रा. घाटनांदूर, जि. बीड) आणि निरज (वय 22) अशी अपघात ठार झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पिठाची पोती भरलेला कंटेनर शिगावहून उत्तर प्रदेशकडे निघाला होता. सोमवारी रात्री कंटेनर घाटात आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर आपली डावी बाजू सोडून दुभाजक तोडत उजव्या बाजूला घुसला. त्याच वेळी समोरून कांदा भरलेला ट्रक निघाला होता.
या ट्रकवर कंटेनरचा पाठीमागील संपूर्ण सांगाडा पडला तर समोरील इंजिन ढाब्याजवळ थांबलेल्या टेम्पोवर जाऊन आदळले. ज्या कांदा वाहूट्रकवर सांगाडा पडला तो ट्रक पूर्णपणे चेपला गेला. त्याखाली चिरडून चालक राजेंद्र आर. डोईफोडे जागीच ठार झाला. शिवाय कंटेनरचालक निरज हा देखील गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
काकती पोलीस ठाण्याचे निरीक्षक राघवेंद्र हल्लुर यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. रात्री सतत पाऊस पडत असल्यामुळे ट्रकमध्ये अडकलेला मृतदेह काढण्यासाठी कसरत करावी लागली. रस्त्यावरच तीनही वाहने आडवी झाल्याने महामार्गावरील वाहतूक कांही काळ ठप्प झाली होती. आज मंगळवारी पहाटे हा रस्ता वाहनांसाठी मोकळा करण्यात आला.