पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गांधीनगरजवळ कार उभी करून लघुशंकेला गेलेल्या एका वृद्धाला दोघा जणांनी मारहाण करून लुटल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी पहाटे घडला होता. याप्रकरणी माळमारुती पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून त्यांच्याकडील लुटलेला माल जप्त केला आहे.
परवेज जमीर पारिशवाडी (रा. आदिलशहा गल्ली, न्यू गांधिनगर) आणि जुबेर अब्दुलरशीद दालायत (रा. खुदादाद गल्ली, न्यू गांधीनगर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून 18 हजार 500 रुपयांची रोकड, एक एटीएम कार्ड, सोनाटा मनगटी घड्याळ आणि एक सॅमसंग कीपॅड मोबाइल असा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबतची माहिती अशी की, पट्टणकुडी (ता. चिक्कोडी) येथील तम्माण्णा मलगौडा सोमण्णावर (वय 61) हे निवृत्त केएसआरटीसीचे निवृत्त कर्मचारी कांही कामानिमित्त मोटारीने बेंगलोरला गेले होते. काम आटपून ते पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी निघाले असताना गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ते गांधीनगर येथील फ्रुट मार्केट नजीकच्या सीएनजी गॅस पंपावर थांबले होते. त्यावेळी ते स्वच्छतागृहाकडे गेले असता दोघा अज्ञातांनी त्यांना गाठून मारहाण केली.
तसेच त्यांच्याकडील 1,240 रुपयांची रोकड, हातातील मनगटी घड्याळ व मोबाइल संच काढून घेतला. त्यावेळी सोमण्णावर यांच्याकडे एटीएम कार्ड आढळून आल्याने लुटारूंनी एटीएममधून 21 हजार रुपयांची रक्कम देखील त्यांना काढण्यास सांगुन ती देखील हिसकावून घेतली. त्यानंतर लुटारूंनी घटनास्थळावरून पलायन केले होते.
यासंदर्भात सोमण्णावर यांनी शुक्रवारी माळमारुती पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीची दखल घेऊन मार्केट उपविभागाचे एसीपी नारायण बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती पोलीस ठाण्याचे सीपीआय सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक स्थापण्यात आले होते.
या पथकाने उपरोक्त दोघा जणांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडील लुटलेला ऐवज जप्त केला. तसेच आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सदर कारवाईबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी माळमारुती पोलिसांचे अभिनंदन करून शाबासकी दिली आहे.