आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदा स्वातंत्र्य दिनाचा हीरक महोत्सव असला तरी कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नसल्यामुळे मागील वर्षाप्रमाणे यंदाचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय आज शुक्रवारी झालेल्या स्वातंत्र्यदिन पूर्वतयारीच्या बैठकीत घेण्यात आला.
येत्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तयारी संदर्भातील पूर्वतयारीची बैठक आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ हे होते. त्याचप्रमाणे व्यासपीठावर निवासी जिल्हाधिकारी अशोक धुडगूटी, बुडा आयुक्त जी. टी. दिनेशकुमार आणि पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आपटे उपस्थित होते. बैठकी आगामी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासंदर्भात चर्चा आणि विचार विनिमय करण्यात आला.
यंदा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा यंदा हीरक महोत्सव असला तरी कोरोना प्रादुर्भावाचे संकट अद्याप टळलेले नाही त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे साधेपणाने स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे बैठकीत ठरले. गतवर्षाप्रमाणे यंदा देखील गर्दी न करता सीपीएड मैदानावर कोरोनाचे नियम पाळून फक्त निमंत्रित पाहुणे प्रशासकीय व पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत पोलीस परेडसह ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात यावा. त्यानंतर फळांचे वितरण आदी स्वातंत्र्यदिनी दरवर्षी आयोजित केले जाणारे उपक्रम राबविण्यात यावेत. शेवटी स्वातंत्र्यदिनी सायंकाळी 5 वाजता नेहरूनगर येथील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेत कोरोना मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन करून तास-दीड तासाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जावे असे बैठकीत ठरविण्यात आले.
यावेळी सूचना करताना माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेचे अध्यक्ष विकास कलघटगी यांनी यंदा स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय मुलामुलींसाठी ऑनलाईन निबंध आणि गायन स्पर्धा आयोजित केली जावी असे सांगून ध्वज आचारसंहिता जाहीर करावी. तसेच त्या अनुषंगाने कुठेही राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेतली जावी. याखेरीज प्लास्टिकचे ध्वज आणि फरफऱ्यांवर बंदी घातली जावी. बऱ्याच जणांना राष्ट्रध्वज कुठे मिळतात याची माहिती नसते, त्यासाठी राष्ट्रध्वज खरेदी करण्याची ठिकाणे जाहीर केली जावीत, अशा सूचना केल्या.
सदर बैठकीत स्वातंत्र्य दिन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विविध समित्या आणि उपसमित्या नेमण्यात आल्या. तसेच या समित्यांमधील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांवर ठरावीक जबाबदारी सोपविण्यात आली. बैठकीस पोलीस अधिकाऱ्यांसह विविध सरकारी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.