चिक्कोडी तालुक्यातील चंदूर गावच्या 9 विद्यार्थ्याना यंदाच्या एसएसएलसी वार्षिक परीक्षेला मुकावे लागले असून शिक्षकांच्या आडमुठेपणामुळे हे घडले असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
चंदूर (ता. चिक्कोडी) गावच्या गुरुदेव रानडे हायस्कूलमधील शिक्षकांनी शाळेतील 6 दलित विद्यार्थ्यांसह एकूण 9 विद्यार्थ्यांचे परीक्षेचे फॉर्म भरून पाठविलेले नाहीत. त्यामुळे येत्या 19 आणि 22 जुलै 2021 रोजी होणाऱ्या एसएसएलसीच्या वार्षिक परीक्षेला बसण्यास संबंधित विद्यार्थी अपात्र ठरले आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव बंडगर आणि वर्गशिक्षक विजय मडिवाळर यांनी जाणीवपूर्वक आमच्या मुलांचे परीक्षेचे फॉर्म भरून पाठविले नाहीत. हे दोघे आमच्या मुलांच्या भविष्याशी खेळत असून मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना परीक्षेला बसण्यास परवानगी दिली जावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
दुसरीकडे संबंधित विद्यार्थ्यांच्या खुद्द पालकांनीच आमची मुले वार्षिक परीक्षेला बसू शकणार नसल्याचे पत्र दिले असल्याचे स्पष्टीकरण गुरुदेव रानडे हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक विजय मडिवाळर आणि शाळा व्यवस्थापन मंडळाने दिले आहे.