बेेेळगाव शहरातील रविवार पेठ या मध्यवर्ती बाजारपेठेच्या ठिकाणी गेल्या तीन-चार महिन्यांपासून साचून पडलेल्या घाण व केरकचर्याच्या ढिगाऱ्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून हा ढिगारा हटवून त्वरित स्वच्छता केली जावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
कोरोनाचे संकटमय वातावरण असल्यामुळे सरकार आणि पर्यायाने प्रशासनाकडून स्वच्छतेवर भर दिला जात आहे. त्यासाठी सातत्याने जाहीर आवाहन केले जात आहे. मात्र याचे नेमके उलट चित्र शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रविवार पेठेमध्ये पहावयास मिळत आहे.
ज्या ठिकाणी गेल्या तीन -चार महिन्यांपासून कचरा व घाणीचा ढिगारा साचला आहे. मात्र याकडे बेळगाव महापालिकेचे मात्र साफ दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणी प्रचंड प्रमाणात घाण व केरकचरा साचलेला असतानादेखील महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांचे अद्यापही याकडे कसे काय लक्ष गेले नाही? याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
रविवार पेठेतील सार्वजनिक गणपती ज्या ठिकाणी बसतो त्याच्या मागील बाजूस असणार्या बागी यांच्या दुकाना शेजारील खुल्या जागेवर गेल्या काही महिन्यापासून केरकचर्यासह टाकाऊ भाजीपाला आदी मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे.
परिणामी त्याचा मोठा ढिगारा साचला असल्यामुळे अस्वच्छतेच्या वातावरणातसह परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा आसपासच्या दुकानदारांसह खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या घाण व केरकचऱ्यामुळे डास आणि माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
कोरोना बरोबरच सध्या डेंग्यूची साथ देखील सुरू झाली आहे. तरी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्तांसह आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि रविवार पेठेतील कचर्याचा ढिगारा युद्धपातळीवर हटवून परिसर स्वच्छ करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी व्यापारी आणि नागरिकांकडून केली जात आहे.