राज्य सरकारचे आगामी हिवाळी अधिवेशन बेळगावात घेतले जावे, असा आग्रह विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी धरला असून त्यासंदर्भात त्यांनी सरकारला पत्रही पाठवले आहे.
याबाबत बेंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, बेळगावला 2018 मध्ये हिवाळी अधिवेशन झाले होते. त्यानंतर आजपर्यंत अधिवेशन होऊ शकले नाही. उत्तर कर्नाटकामध्ये अनेक समस्या आहेत.
मी स्वतः आणि गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासारखे अनेक नेते उत्तर कर्नाटकाचे प्रतिनिधित्व करत आहोत. तेथील समस्यांची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे येत्या डिसेंबरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे घेतले जावे, अशी आमची मागणी आहे.
यासंदर्भात आपण पंधरा दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून तसे पत्रही त्यांना धाडले असल्याचे होरट्टी यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांची याबाबत प्रतिक्रिया काय? असे विचारता, आपण मंत्रिमंडळाची चर्चा करू आणि लवकरच त्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सभापती बसवराज होरट्टी यांनी स्पष्ट केले.
बेळगावात अधिवेशन होणार की नाही याबाबत मुख्यमंत्री गुरुवारी निर्णय घेणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.