वकिलांसाठी कोरोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्याची व्यवस्था संबंधित खात्याला सांगून केली जावी, अशी विनंती बेळगाव बार असोसिएशनतर्फे जिल्हाधिकार्यांना करण्यात आली आहे.
बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखालील वकिलांच्या शिष्टमंडळाने उपरोक्त विनंतीचे निवेदन आज मंगळलारी जिल्हाधिकारी एम. जी. यांना सादर केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव बार असोसिएशनने जिल्हा आरोग्य खात्याच्या सहकार्याने गेल्या 21 एप्रिल रोजी वकिलांना कोरोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोस देण्याची मोहीम पार पडली आहे. सदर लसीकरण शिबिर आयोजित करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.
आता वकिलांना त्यांचा दुसरा डोस 14 जुलै रोजी देणे आवश्यक आहे. सरकारकडून वकिलांच्या मोबाईलवर दुसरा डोस घेण्याचे संदेशही येत आहेत. तेंव्हा संबंधित खात्याला सांगून वकिलांना दुसरा डोस देण्याची व्यवस्था केली जावी, अशा आशयाचा तपशील विनंती निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी ॲड. गजानन पाटील यांच्यासह ॲड. मारुती काम्माणाचे,ॲड शिवपुत्र फटकळ,आदी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती प्रादेशिक आयुक्त व बीम्सचे प्रशासक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देखील सादर करण्यात आले आहेत.