बाराव्या शतकात जगद्गुरु बसवेश्वर यांच्याशी झालेली फितुरी पुनरावृत्ती आज पुन्हा बी. एस. येडियुरप्पा यांच्या बाबतीत झाली आहे, असे वक्तव्य केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले.
बेळगावात पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. बाराव्या शतकात जगद्गुरु बसवेश्वर यांच्याविरुद्ध कांही लोकांनी फितुरी केली होती. तशीच फितुरी आज बी. एस. येडियुरप्पा यांच्या बाबतीत घडली आहे. एक हजार वर्षानंतर बसवेश्वर यांच्या फितुरीची पुनरावृत्ती झाली आहे.
मनुवाद्यांनी त्या काळात बसवेश्वरांच्या विरोधात फितुरी करण्यात यश मिळवले होते, आज भाजपमध्ये येडियुरप्पा यांना खाली खेचण्यात कांहीजण यशस्वी झाले आहेत असे सांगून दबाव तंत्राने त्यांना खाली खेचून त्यांचा अपमान करण्यात आला आहे, असे सतीश जारकीहोळी म्हणाले.
येडियुरप्पा यांचा राजीनामा घेणे हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असला तरी दबाव तंत्राने एखाद्याला खाली खेचणे योग्य नाही. भाजपच्या कार्यक्रमात येडियुरप्पा यांनी भावुक होऊन घोषणा केली हे अत्यंत खेदजनक आहे. बाराव्या शतकात जशी बसवण्णांच्या बाबतीत फितुरी झाली तशीच आज येडियुरप्पा यांच्या बाबतीत झाली आहे. बी. एस. येडियुरप्पा हे राज्यातील भाजपचे प्रभावी नेते होते. मात्र आज दबाव तंत्रामुळे ते खाली खेचले गेले आहेत, असे जारकीहोळी म्हणाले.
येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला लाभ होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना राजीनामा देणे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्याशी कॉंग्रेसचा कांहीही संबंध नाही, असेही सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.