बेळगाव मधील सर्वात जुनी आणि नामवंत क्रीडा संस्था असलेल्या युनियन जिमखाना प्राव्हेडेट लिमिटेडसह कॅटोंमेंट बोर्ड हद्दीतील इतर आस्थापने क्रीडा संस्था, शाळा, संघ आणि क्लब यांना जागा रिकामी करा, असा केेंद्राचा आदेश आल्यामुळे एकच गोंधळ माजला होता.
युनियन जिमखान्यासह कर्नाटकातील अनेक संस्थांना 2 ऑगष्ट पर्यंत उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे केंद्र सरकारच्या डिफेन्स इस्टेट बेंगलोर यांच्या वतीने सुधीर आणि बेळगाव कॅटोंमेंट बोर्डातर्फे इंजिनियर सतीश मन्नूरकर यांनी गुरुवार दि. 15 रोजी सकाळी युनियन जिमखान्याला भेट देवून व्यवस्थापक महांतेश देसाई यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना पुढील कारवाईसाठी आम्ही येणार, असे सांगितले.
युनियन जिमखाना मैदानाला वाचविण्यासाठी सध्या कार्यात असलेल्या कार्यकारी मंडळांनी ज्येष्ठ वकिलांकडून सल्ला घेऊन जिमखान्याचा कायमस्वरूपी तोडगा काढावा.
खुर्चीच्या मोहापायी न लागता लवकरात लवकर युनियन जिमखाना कसा वाचविला जाईल, याकडे बेळगावच्या क्रीडा शौकिनांचे लक्ष लागले आहे.