बेळगाव शहर व तालुक्यासह खानापूर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच असल्यामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे. खानापूर तालुक्यात कणकुंबी येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
खानापूर तालुक्यातील विविध भागात पावसाची सतत रिपरिप सुरू असून हवेत गारठा निर्माण झाल्यामुळे सर्दीपडसे- ताप सारख्या आजारांचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. खेडेगावांमध्ये लहान मुले थंडीने आजारी पडू लागले आहेत. संततधार पावसामुळे नदी-नाले आणि तलावांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. बेळगाव व खानापूर तालुक्याच्या शिवारातून रोप लागवडीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. खानापूरात रोप लागवडीचा चिखल करण्यासाठी ट्रॅक्टर, पावर ट्रेलर यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. रोप लागवडीच्या कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे त्यामुळे शेतकरी मजूर मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.
सततच्या पावसामुळे कणकुंबी पर्जन्यमापन केंद्रात सर्वाधिक 102.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील अन्य पर्जन्यमापन केंद्रांपैकी जांबोटी येथे 42.6 मि. मी. लोंढा पीडब्ल्यूडी येथे 56 मि. मी., लोंढा रेल्वे स्टेशन 53 मि. मी., गुंजी 33.6 मि. मी., असोगा 44.2 मि. मी., कक्केरी 15.6 मि. मी., बीड 10.6 मि. मी. नागरगाळी 35.6 मि. मी. तर खानापूर येथे 36.6 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, कृष्णा खोऱ्याच्या कर्नाटक व्याप्तीत येणाऱ्या जलाशयातील पाणीसाठा व पाणी पातळीचा तपशील पुढील प्रमाणे आहे. हिडकल जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता 51.00 टीएमसी, सध्याचा पाणीसाठा 32.28 टीएमसी, सध्याची पाणी पातळी 655.08 मीटर, सध्याचा इनफ्लो 10239.00 क्युसेस, सध्याचा आउटफ्लो 131.00 क्युसेस. मार्कंडेय जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता 3.69 टीएमसी, सध्याचा पाणीसाठा 3.05 टीएमसी, सध्याची पाणी पातळी 701.90 मीटर, सध्याचा इनफ्लो 629.00 क्युसेस, सध्याचा आउटफ्लो 455.00 क्युसेस.
अलमट्टी जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता 123.00 टीएमसी, सध्याचा पाणीसाठा 94.92 टीएमसी, सध्याची पाणी पातळी 517.8 मीटर, सध्याचा इनफ्लो 52518.00 क्युसेस, सध्याचा आउटफ्लो 36477.00 क्युसेस. नारायणपूर जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता 33.31 टीएमसी, सध्याचा पाणीसाठा 29.11 टीएमसी, सध्याची पाणी पातळी 491.31 मीटर, सध्याचा इनफ्लो 43437.00 क्युसेस, सध्याचा आउटफ्लो 33950.00 क्युसेस. मलाप्रभा जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता 37.73 टीएमसी, सध्याचा पाणीसाठा 21.84 टीएमसी, सध्याची पाणी पातळी 629.78 मीटर, सध्याचा इनफ्लो 2370.00 क्युसेस, सध्याचा आउटफ्लो 194.00 क्युसेस.