शहरातील सुप्रसिद्ध दानशूर गोगटे परिवारातर्फे गोगटे सर्कल येथे बांधण्यात आलेल्या ट्रॅफिक पोलीस बुथचा उद्घाटन समारंभ आज सोमवारी सकाळी शानदाररित्या उत्साहात पार पडला.
सदर उद्घाटन समारंभास उद्घाटक म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके आणि जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ उपस्थित होते. या उभयतांच्या हस्ते फित कापून बुथचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून पोलिस आयुक्त डॉ. त्यागराजन के., पोलिस उपायुक्त चंद्रशेखर निलगार, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ बर्चस्वा आदी उपस्थित होते. प्रारंभी गोगटे परिवारातर्फे शिरीष गोगटे यांनी सर्वांचे स्वागत करून या उपक्रमाबद्दल माहिती दिली.
चाळीस वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री विराप्पा मोईली यांनी या चौकाचे रावसाहेब गोगटे यांच्या सन्मानार्थ गोगटे चौक असे नामकरण केले होते. या चौकात मोठ्या प्रमाणात रहदारी असते, त्यामुळे या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या रहदारी पोलिसांना थंडी, वारा, ऊन, पाऊस यांच्यापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने गोगटे परिवारातर्फे आम्ही हा ट्राफिक पोलीस बुथ बांधला असून तो आज पोलिसांना समर्पित करीत आहोत असे सांगून सर्व सरकारी खात्यांच्या सहकार्यामुळे हे कार्य शक्य झाल्याचे शिरीष गोगटे यांनी स्पष्ट केले.
आमदार अनिल बेनके यांनी आपल्या भाषणात दिवंगत रावसाहेब गोगटे यांनी बेळगावसाठी दिलेल्या अनेक योगदानचा आवर्जून उल्लेख केला आणि गोगटे परिवाराबद्दल प्रशंसोद्गार काढले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी गोगटे परिवाराने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केले असल्याचे सांगून जी. आय. टी. कॉलेज असो किंवा गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स असो यामुळे शहरच नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन शिक्षणाची चांगली सोय झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन यांनी आपल्या भाषणात गोगटे परिवाराच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. याप्रसंगी अरविंद गोगटे, आनंद गोगटे, माधव गोगटे, ओंकार गोगटे व सौ. मंगला गोगटे हे गोगटे परिवाराचे सदस्य तसेच अविनाश पोतदार, दीपक पवार, अजित सिद्दणावर, बसवराज विभुते, अजित इनामदार, खानोलकर, पाटणेकर आदींसह बहुसंख्य हितचिंतक आणि निमंत्रित उपस्थित होते. शेवटी शिरीष गोगटे यांनी सर्वांचे आभार मानले.