विविध ऑनलाइन फसवणुकी प्रकरणांचा छडा लावताना बेळगाव सीईएन पोलीस स्थानकाने 2020 -21 या कालावधीत ऑनलाइन फसवणूक झालेल्या नागरिकांचे 29 लाख रुपये परत मिळवून दिले आहेत अशी माहिती देऊन ऑनलाइन फसवणुकीच्या बाबतीत नागरिकाने 24 तासाच्या आत तक्रार करावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी केले आहे.
ऑनलाइन फसवणूक प्रकरणासंदर्भात बेळगाव सीईएन पोलीसांनी केलेल्या कामगिरी संदर्भात पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी आज शनिवारी सकाळी पत्रकारांना पुढीलप्रमाणे माहिती दिली. बेळगाव सीईएन पोलीस खात्याकडे गेल्यावर्षी 2020 साली ऑनलाइन फसवणुकीची 38 प्रकरणे आणि 2021 आली 9 प्रकरणे दाखल झाली होती. या प्रकरणांचा तपास करून फसवणूक झालेल्यांना 29 लाख रुपये परत मिळवून देण्यात आले आहेत.
ऑनलाइन फसवणुकीच्या बाबतीत बऱ्याच जणांनी उशिरा तक्रार नोंदविली, तसेच बऱ्याच जणांनी उशिरा संबंधित बँकांना खाते गोठविण्यातची सुचना केली. त्यामुळे ज्यांची लुबाडणूक झाली त्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. यासाठी आमची विनंती आहे की, सायबर अर्थात ऑनलाइन फसवणुकीच्या बाबतीत संबंधितांनी त्वरेने पोलिसांशी संपर्क साधावा. फसवणूक झालेल्यांनी तासाभरात तक्रार केल्यास संबंधितांचे आर्थिक नुकसान टळू शकते. त्याचप्रमाणे पोलिसांना देखील आरोपींपर्यंत पोचणे सुलभ जाते. ज्याप्रमाणे एखादा अपघात झाला आणि गंभीर जखमी रुग्णांवर तासाभरात उपचार केले तर त्याचा जीव वाचू शकतो.
त्याप्रमाणे सायबर फसवणूक प्रकरणात घटना घडल्या नंतर एक तासाच्या आत संबंधितांनी पोलिसांकडे तक्रार केल्यास आम्ही बँक खाते गोठवून लुबाडले पैसे परत मिळवून देऊ शकतो, असे पोलीस उपायुक्त डॉ आमटे यांनी स्पष्ट केले.
बेळगाव शहरातील सीईएन पोलीस स्थानकात गेल्या 2020 -21 सालामध्ये एकूण 47 ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये 60 लाखाहून अधिक रुपयांची आर्थिक लुबाडणूक करण्यात आलेलो आहे. मात्र तात्काळ तक्रार केलेल्यांना एकूण 29 लाख रुपये परत मिळवून देण्यात आले आहेत. फसवणूक झाल्याचे समजताच नागरिकांनी तात्काळ पोलीस आणि बँकेला त्याची माहिती द्यावी, जेणेकरून आम्हाला लुबाडण्यात आलेली रक्कम संबंधितांना परत मिळवून देणे शक्य होऊ शकते, असे पोलीस उपायुक्त डॉ आमटे म्हणाले.
बेळगाव शहरात गेल्या 2020 -21 सालामध्ये घडलेल्या ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये ओटीपी फ्रॉड, ओएक्सएल फ्रॉड, लींक फ्रॉड, फेसबुक फ्रॉड, क्यूआर कोड फ्रॉड, जॉब फ्रॉड, गिफ्ट फ्रॉड, व्हाट्सअप फ्रॉड, इन्शुरन्स फ्रॉड, ऑनलाइन ऑस्ट्रोलॉजी फ्रॉड, फेक वेबसाईट फ्रॉड, हरबल प्रोडक्टस फ्रॉड, व्हेईकल रेंट फ्रॉड साधी प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिली. तसेच ऑनलाइन फसवणुकीच्या बाबतीत नागरिकांनी तात्काळ तक्रार करावी, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले आहे.