टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपोला अत्यंत जुना इतिहास आहे. वैविध्यपूर्ण झाडे, वनस्पत आणि पक्षांनी समृद्ध असा शुद्ध हवा देणारा हा निसर्गरम्य परिसर बेळगावचे फुफ्फूस आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या बांधकामाला परवानगी दिली जाऊ नये, असे स्पष्ट मत बेळगावातील जाणकार व्यक्तींकडून व्यक्त केले जात आहे.
बेळगावचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हॅक्सिन डेपो येथे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध विकास कामे राबविली जात होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेताच ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. यासंदर्भात बेळगाव लाईव्हने शहरातील कांही जाणकारांशी संपर्क साधला असता त्यांनी खालील प्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
व्हॅक्सिन डेपो येथे कोणत्याच प्रकारचे बांधकाम करता कामा नये, असे स्पष्ट मत व्यक्त करून माजी महापौर ॲड. नागेश सातेरी म्हणाले की, जवळपास एक दशकापूर्वी एचडी कुमारस्वामी हे जेंव्हा पहिल्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी सुवर्ण विधानसौध इमारत टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो येथे उभारण्याचा प्रस्ताव होता. त्याच्या भूमिपूजन समारंभासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा बेळगावला आले होते. त्यावेळी आमची नागरीक हित संरक्षण समिती पाॅवरफुल्ल होती. मी सेक्रेटरी होतो आणि ॲड. अशोक पोतदार अध्यक्ष होते. त्यावेळी नागरिक हित संरक्षण समितीने जोरदार आवाज उठवून त्या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविताना काळे झेंडे दाखवून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. तेंव्हा तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख हेमंत निंबाळकर यांनी आम्हाला आंदोलन छेडू नका अशी विनंती करून आमची मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याशी सर्किट हाऊस येथे भेट घडवून आणली होती. या भेटीप्रसंगी व्हॅक्सिन डेपो येथे विधानसौध इमारत नको, असे आम्ही स्पष्टपणे सांगितले होते. व्हॅक्सिन डेपो हे टिळकवाडी ऑक्सिजन चेंबर आहे. विधानसौध इमारतीमुळे हे ऑक्सिजन चेंबर पूर्णपणे नष्ट होईल. त्याशिवाय जर या ठिकाणी विधानसौध इमारत झाली तर अधिवेशनावेळी नेते मंडळींची ये-जा सुरू होऊन टिळकवाडी पूर्णपणे बंद ठेवावी लागेल आदी बाबी कुमार स्वामी यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यामुळेच सुवर्ण विधानसौधची इमारत व्हॅक्सिन डेपो ऐवजी शहराबाहेर उभारण्यात आली.
तेंव्हापासून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास आमचा विरोध आहे. सध्या जे ग्लास हाऊस आहे त्याचा खरंतर काडीचाही उपयोग नाही. व्हॅक्सिन डेपोला 3 हजार वर्षाचा इतिहास आहे. या ठिकाणी दुर्मिळ झाडे, वनस्पती आम्ही पक्षी आहेत. तेंव्हा तेथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम होऊ नये या मताचे आम्ही आहोत असे माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांनी शेवटी स्पष्ट केले.
प्यास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना जो कांही विकास साधायचा असतो तो पर्यावरणाचा समतोल साधून केला गेला पाहिजे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हॅक्सीन डेपोच्या बाबतीत ज्या कांही विकास योजना आखल्या जात आहेत, त्यामुळे पर्यावरणाला बाधा पोहोचणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे असे सांगून विकास हा झालाच पाहिजे. मात्र त्याच वेळी पर्यावरणाचे भान देखील ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख हे देखील पर्यावरणप्रेमी असून त्यांच्या मते व्हॅक्सिंन डेपो येथील वृक्षराईनी समृद्ध अशा पर्यावरण पूरक वातावरणाला तडा जाईल अशी अनावश्यक विकास कामे त्याठिकाणी राबवली जाऊ नयेत. विकास कामे जरूर राबवावीत, परंतु ही राबवताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. झाडं जुनाट झाली असतील किंवा कोसळण्याच्या मार्गावर असतील तरच ती तोडली जावीत आणि हे करताना नव्याने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन केले जावे, असेही शेख म्हणाले.
सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे प्रमुख आणि पर्यावरण प्रेमी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर म्हणाले की, नव्या सुधारणा या झाल्याच पाहिजेत, मात्र त्या जनहिताच्या असल्या पाहिजेत. आता व्हॅक्सिन डेपोमध्ये एव्हिएशन संदर्भातील प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे समजते. हा प्रकल्प झाला पाहिजे, परंतु तो व्हॅक्सिन डेपो मध्येच का? बेळगावात इतरत्र बऱ्याच खुल्या जागा आहेत. त्या ठिकाणी तो का केला जात नाही? व्हॅक्सिन डेपोतील पर्यावरणाचा ऱ्हास करून हा प्रकल्प राबविणे गैर आहे. शिवाय प्रत्येक वेळी विकासाच्या नांवाखाली व्हॅक्सिन डेपोलाच का लक्ष्य केले जाते असा सवाल करून उलट आता व्हॅक्सिन डेपोमध्ये जी वृक्षतोड झाली आहे, त्या ठिकाणी पुन्हा वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संवर्धन केले गेले पाहिजे असे मत सुरेंद्र अनगोळकर यांनी व्यक्त केले.