बेळगाव ग्रामीण भागातील लोकांना कोरोना प्रतिबंधक लस वेग वाढवावा अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
बेळगाव जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी आज सोमवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
सरकारकडून जनतेसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांना याचा अल्प लाभ मिळत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. कंग्राळी खुर्द हे गाव सुमारे 15 हजार लोकसंख्येचे आहे. मात्र येथील फक्त 620 जणांचेच लसीकरण झाले आहे. त्याचप्रमाणे आंबेवाडी, मण्णूर, गोजगा, उचगाव, चिरमुरी, कुद्रेमनी, बाची, कोणेवाडी, बसूर्ते, अलतगा आदी ग्रामीण भागात पूर्णपणे लसीकरण झालेले नाही.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतकरीवर्ग आहे. येथील नागरिकांना परराज्यात जायचे असेल तर लसीकरणाचे प्रमाणपत्र गरजेचे आहे. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरी कृपया ग्रामीण भागातील नागरिकांसाठी लसीकरण उपलब्ध करून द्यावे.
याव्यतिरिक्त एपीएमसी ते कंग्राळी खुर्द पर्यंत स्मार्ट सिटी अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याचे विकासकाम रास्तारोको वगैरे आंदोलने करून देखील अद्याप पूर्ण झालेले नाही. तेंव्हा याकडेही लक्ष देऊन या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांच्यासमवेत आर. आय. पाटील,कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीचे सदस्य महेश धामणेकर, प्रशांत पाटील, विनायक कम्मार, राकेश धामणेकर. तसेच महादेव दिंडे, परशराम मेंडके, गजानन,पाटील, मनोहर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.