खानापूर तालुक्यातील हलशी व कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्रांना लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे या भागातील रुग्णांची सोय होणार आहे.
खानापूर तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत त्यामुळे अत्यावश्यक उपचाराची गरज असताना रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.
कोरोनाचे संकट निर्माण झाल्यापासून खानापूर तालुक्यातील अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला आहे. याबाबत मंगळवारी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकारी संजीव नांदरे यांची भेट घेऊन हलशी इतर गावांना रुग्णवाहिका उपलब्ध देण्याची आग्रही मागणी केली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या रुग्णाला तातडीने तालुका रुग्णालय किंवा बेळगावला घेऊन जायचे असल्यास येत असलेल्या अडचणींचा पाढा वाचला.
तसेच गेल्या काही दिवसात योग्य वेळी रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने मृत्यू झालेल्या लोकांची माहिती आरोग्य अधिकाऱ्याना दिली तसेच लवकर रुग्णवाहिका उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.
त्यावेळी नांद्रे यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून याबाबत लवकरच कागदपत्रांची पूर्तता करून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन दिले
हलशी व कणकुंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी तयारी करण्यात आली आहे आरटीओकडे याबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच कागदपत्रांची पूर्तता होताच हलशी व कणकुंबी गावाला रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे अशी माहिती डॉ. संजीव नांदरे यांनी दिली.