बेळगाव रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाची कामं येत्या डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. यासंदर्भात खासदार मंगल अंगडी यांनी आज सोमवारी या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली.
खासदार मंगल अंगडी यांनी आज सोमवारी सकाळी बेळगाव रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी आमदार ॲड. अनिल बेनके, अरुणकुमार पाटील (डीजीएम आरव्हीएनएल सिव्हिल), रेल्वे अधिकारी सुनील आपटेकर आदीं समवेत रेल्वे स्थानक नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली.
नूतनीकरणाचा आराखडा जाणून घेण्याबरोबर त्यांनी त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही केल्या. त्यानंतर खासदार अंगडी यांनी पत्रकार परिषद घेऊन बेळगाव रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाची वैशिष्ट्ये सांगितली.
बेळगाव रेल्वे स्थानक नूतनीकरण प्रकल्प अंदाजे 190 कोटी रुपये खर्चाचा असून तो येत्या डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करावयाचा आहे या विकास प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने पुढील कामांचा समावेश असणार आहे. 1) रेल्वेस्थानकाच्या नव्या मुख्य प्रवेशद्वाराच्या इमारतीची उभारणी आणि तिच्या आसपासच्या परिसराचा विकास व संबंधित कामं, 2) दुसऱ्या प्रवेशद्वार इमारतीची उभारणी आणि तिच्या आसपासच्या परिसराचा विकास व संबंधित कामं,
3) पीट लाईन, सिक लाईन शेडसह सिक लाईन आणि सर्व्हीस बिल्डिंगचा समावेश असलेला नियोजित कोचिंग डेपो, 4) अतिरिक्त प्लॅटफॉर्म पीएफ नं.- 04 सह यार्ड पुनर्बांधणीचे काम आणि नवा फूट ओव्हर ब्रिज.