एरोनॉटिकल इंजिनीअरिंग अभ्यासक्रमा संदर्भात विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ अर्थात व्हीटीयू आणि एएफटीसी यांच्यात सामंजस्याचा करार करण्यात आला आहे.
एएफटीसीचे कमांडंट बीजी फिलिप्स यांनी व्हीटीयूचे उपकुलगुरू डॉ. करीसिध्दप्पा यांच्यासमवेत एरोनॉटिकल इंजिनीअरिंग अभ्यासक्रमा संदर्भातील सामंजस्याच्या करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्या.
या करारानुसार विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ हवाई दलात कारकीर्द घडवू पाहणाऱ्या युवकांसाठी अभ्यासक्रम सुरू करून सहा वेगवेगळ्या स्पेशलायझेशनमध्ये एमटेक पदवी बहाल करणार आहे. सदर अभ्यासक्रम एएफटीसी आणि व्हीटीयुच्या नियमानुसार तयार केलेला असणार आहे. या कराराद्वारे उचलण्यात आलेले पाऊल युवा पिढीला भारतीय हवाई दलातील तांत्रिक विभागात सामील होण्याच्या दृष्टीने प्रेरणादायक ठरेल, असा आशावाद बीजी फिलिप्स यांनी व्यक्त केला आहे.
व्हीटीयूचे उपकुलगुरू डॉ. करीसिध्दप्पा यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी विद्यापीठाचे निबंधक डॉ ए. एस. देशपांडे यांनी सर्वांचे स्वागत केले.
याप्रसंगी ग्रुप कॅप्टन डाॅ. राजू, मॅनेजमेंट स्टडीज अँड ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. महेश इम्मी, स्पेशल ऑफिसर डॉ. एम. एम. मुंशी, डॉ. एस. बी. हलभावी आदी उपस्थित होते.