सीमा लढ्याचा इतिहास सांगणारे ‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ हे पुस्तक बेळगाव खानापूरसह सीमाभागातील प्रत्येक मराठी भाषिक युवकांपर्यंत पोचविण्यासाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी दिली.
शहरातील जीएसएस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि सीमा लढ्याचे जाणकार प्रा. आनंद मेणसे यांनी महाराष्ट्र -कर्नाटक (बेळगाव) सीमाप्रश्नावर लिहिलेल्या ‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या 21 ऑगस्ट रोजी होणार आहे.
यासंदर्भात खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रा. आनंद मेणसे यांची भेट घेतली. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी सीमाप्रश्नावर पुस्तक लिहिल्याबद्दल प्रा. मेणसे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदकरण्याबरोबरच शुभेच्छा दिल्या. युवा समितीच्या पंतप्रधान मोदी यांना 9 आगष्ट क्रांती दिनी 11हजार पत्रं लिहिण्याच्या मोहिमेला शुभेच्छा देत स्वतः पत्र लिहिणार असल्याचे मेणसे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना धनंजय पाटील म्हणाले की, प्रा आनंद मेणसे सरांनी लिहिलेल्या पुस्तकाची बेळगाव, खानापूर तालुक्यासह समस्त सीमाभागातील मराठी भाषिकांच्या तिसऱ्या पिढीसाठी उपयुक्तता असेल. सरांनी पुस्तक लिहिले त्यामागे कॉम्रेड कृष्णा मेणसे सरांचे बाळकडू असणारा हे सीमा लढ्यातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून कॉ. कृष्णा मेणसे सरांना ओळखले जाते.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेल्या या पुस्तकातून तिसर्या पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल असे सांगून ‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ हे पुस्तक बेळगाव व खानापूर तालुक्यासह सीमाभागातील जास्तीत जास्त मराठी युवकांपर्यंत पोचविण्यासाठी खानापूर म. ए. युवा समिती सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. याप्रसंगी खानापूर युवा समितीचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.