मार्कंडेय नदीला आलेल्या पुरामुळे मण्णूर (ता. बेळगाव) गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे वाहून गेल्यामुळे सध्या या रस्त्याची पार वाताहत झाली असून युद्धपातळीवर या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.
मुसळधार पावसामुळे मार्कंडेय नदीला आलेल्या पुरात तालुक्यातील जवळपास सर्व रस्त्यांचे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे मण्णूर गावाकडे जाणारा मुख्य रस्त्याची तर पार दुर्दशा झाली आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे या रस्त्यावरील डांबरीकरण संपूर्णपणे वाहून गेल्यामुळे सध्या हा रस्ता लाल मातीचा चिखलाने माखून गेला आहे.
सदर रस्त्यावर सर्वत्र चिखलाची दलदल निर्माण झाली आहे. या चिखलातून अवजड वाहने गेल्यामुळे रस्ता कांही ठिकाणी उंच सखल बनला आहे. परिणामी वाहनचालकांसाठी विशेषतः दुचाकी वाहन चालकांसाठी सदर रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे.
दुचाकी वाहन चालक आणि पादचाऱ्यांना या रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी तर या रस्त्यावरून ये-जा करणे म्हणजे आव्हानच ठरत आहे.
तरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांसह या भागाच्या लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्ता लवकरात लवकर वाहतूक योग्य दुरुस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.