बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 4/ अ च्या खानापूर- रामनगर पर्यंतच्या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने करण्यात येत आहे. यांच्या निषेधार्थ शनिवारी खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. यावेळी तहसीलदारांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन देण्यात आले.
खानापूर -रामनगर पर्यंतचा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक दिवसापासून प्रलंबित आहे.त्यामुळे नागरिकांना, वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे .सुमारे 30-40 गावातील रहिवाशांना याचा त्रास होत आहे. याकडे लक्ष वेधूनही सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ढिम्मआहे. याचा निषेध म्हणून रूमे वाडी क्रॉस येथे शनिवारी खानापूरच्या आ. अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला .यावेळी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना देण्यासाठीचे निवेदन तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांना देण्यात आले.
यावेळी बोलताना आ. अंजली निंबाळकर यांनी, केंद्र व राज्यातील भाजप सरकार केवळ आश्वासने देतात , काम मात्र करत नाहीत. लोकांना खोटी आश्वासने देतात .रस्ता दुरुस्तीसाठी मी स्वतःअनेकवेळा निवेदने दिली. परंतु हे काम केलेले नाही. येथील खासदार तर बेपत्ता असल्याचे लोक सांगतात . त्यांनाही जनतेच्या त्रासाची परवा नाही .2 दिवसांत या स्थगित कामाल प्रारंभ झाला नाही तर लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणखी उग्र आंदोलन करू असा इशारा दिला.
तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी निवेदन स्वीकारून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याने गंगवाळी, माणिकवडी ,नायकोल, टिवोली, शिवठाण, भालकी बी.एन.,भालकी के. एच .,जटगे, डिगेगाळी, घोसे,लोंढा, वाटरे, मासळी,कारंजाळ, कपोली, सावर सिंदोळी, सावरगाळी आदी गावांना वाहतुकीला अडथळा येत आहे.