खानापूर तालुक्यातील आंबेवाडी -किरावळे दरम्यानचा तब्बल 44 लाख रुपये खर्चून बांधलेला पूल सध्या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आंबेवाडी ते किरावळे दरम्यानच्या पुलाचे बांधकाम आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी मंजूर करून घेण्याबरोबरच अलीकडेच या पुलाचे उद्घाटन करून तो वाहतुकीस खुला केला होता. मात्र यंदा पहिल्याच पावसात या पुलावरून 3 ते 4 फूट पाणी जात असल्यामुळे तो कुचकामी ठरला आहे.
पावसाळ्याचा अंदाज न घेता, तसेच शास्त्रशुद्धरीत्या हा पूल बांधला गेला नसल्यामुळे आंबेवाडी व किरावळे गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
दरम्यान, हवामान खात्याने वर्तविलेल्या मुसळधार पावसाच्या अंदाजानुसार राज्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बेळगाव शहरासह तालुक्यात काल रात्रभर जोराचा पाऊस झाल्यामुळे नदी -नाले तुडुंब भरून वाहत आहेत.