शहरातील ठिकाणच्या पूर परिस्थिती बाबत आपण महापालिका आयुक्तांशी चर्चा केली असून नागरिकांनी पावसामुळे कांही समस्या उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ महापालिका अधिकारी अथवा श्रीराम सेना हिंदुस्तानशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे.
बेळगाव शहरांमध्ये खोळंबलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांमुळेचं पाण्याचा निचरा होत नाही त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याची जाणीव त्यांनी मनपा आयुक्तांना करून दिली.
श्रीराम सेना हिंदुस्तानचे जिल्हाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी आज शुक्रवारी सकाळी शहरातील ठिकठिकाणच्या पूर सदृश्य परिस्थिती संदर्भात महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त आवाहन केले. गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील ठिकाणच्या सखल भागामधील वसाहतींमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
टिळकवाडीतील पापा मळा, शास्त्रीनगर, पंजीबाबा मठ, आनंदवाडी ,वडगांव आदी पूर परिस्थिती निर्माण झालेल्या भागांचा आपण पाहणी दौरा केला आहे. या पाहणी दौऱ्यानंतर आज त्यासंदर्भात आपण महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. शहरातील पूरसदृश्य परिस्थिती तसेच पावसामुळे निर्माण होणाऱ्या अन्य समस्यांचा सामना करण्यासाठी महापालिकेने सर्व त्या उपाय योजना केल्या असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले आहे.
पूर परिस्थितीत मदत कार्य हाती घेण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्तान देखील सज्ज झाली असून त्यासाठी आम्ही आमच्या सेवाभावी कार्यकर्त्यांचे हेल्पलाइन नंबर फेसबुकवर जाहीर केले आहेत. तेंव्हा सध्याच्या या पावसाळी परिस्थितीत एखादी समस्या उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ महापालिका अधिकार्यांशी अथवा आमच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून आम्हाला त्या समस्यांचे निवारण करता येईल, असे रमाकांत कोंडुसकर यांनी स्पष्ट केले आहे.