कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील गोकाक फॉल्ससह धुपदाळ आणि गोडचीनमलकी या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी आजपासून पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेश जारी केला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात गोकाक फॉल्स अर्थात गोकाकचा धबधबा तसेच धुपदाळ आणि गोडचिनमलकी येथील धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
हे वैशिष्ट्यपूर्ण धबधबे फक्त बेळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर परराज्यातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. दरवर्षी हजारो लोक या धबधब्याच्या ठिकाणी भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटतात. या धबधब्यांच्या ठिकाणी आठवड्या अखेर शनिवार-रविवार सुटीच्या दिवशी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची अधिकच गर्दी होत असते.
सध्या पावसाळा असल्यामुळे या तीनही धबधब्याच्या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. मात्र या ठिकाणी होणारी पर्यटकांची गर्दी कोरोना संसर्ग वाढीस लागण्यास अधिकच कारणीभूत ठरू शकते. बेळगाव जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. भरीस भर म्हणून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आरोग्य खाते आणि पोलीस खाते कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून आजपासून गोकाक धबधबा, धुपदाळ धबधबा आणि गोडचीनमलकी धबधबा या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी तसा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.