बेेेळगाव शहरातील मारुती गल्लीत समोरासमोर दुकान असलेल्या दोन कापड व्यापाऱ्यांमध्ये ग्राहकांवरून हाणामारी झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.
भरदुपारी हाणामारी करणाऱ्या या व्यापाऱ्यांची नांवे मनोज पंजाबी आणि विपुल जोशी अशी आहेत. जाणीवपूर्वक एकमेकांकडे जाणारे गिऱ्हाईक दुसऱ्याने आपल्याकडे वळवून घेणे, एकमेकांचे कामगार फोडणे आदी कारणांमुळे या दोन्ही व्यापाऱ्यांमध्ये पूर्ववैमनस्य होते.
या वैमनस्यातून बुधवारी दुपारी या उभयतांमधील किरकोळ भांडणाचे पर्यवसान एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन हाणामारी करण्यामध्ये झाले. आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी महत्प्रयासाने भांडण सोडविले. खडेबाजार पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.
दरम्यान दोन्ही व्यापाऱ्यांनी परस्पर विरोधी तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. खडेबाजार पोलिस ठाण्यात आज उभय व्यापाऱ्यांना बोलून तक्रार नोंदवून घेतली जात असल्याचे कळते.